Congress : चव्हाण-फडणवीस यांच्या भेटीने राज्याच्या राजकारणात पुन्हा ‘क्लायमॅक्स’, कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे काय आहे म्हणणे?
सध्या गणेश उत्सव सुरु आहे. त्यानिमित्ताने राजकीय नेते हे एकमेकांच्या भेटीगाठीला जात असतातच, यामधून देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झालेली आहे. ती भेट काही उद्देशाने किंवा राजकीय हेतूने झाली असे नाही. त्यामुळे या भेटीतून कोणतेही गैरअर्थ काढू नयेत. शिवाय भाजपाला अशा भेटीतून वावड्या उठवण्याची जुनी सवय आहे.
मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदेंसह इतर 40 आमदारांच्या बंडानंतर आता कुठं नवीन सरकार सत्तेत येऊन स्थिरस्थावर झाले आहे. मात्र, यावरुन आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. हे सर्व होत असताना (Ashok Chavhan) कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी थेट (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही बाब महत्वाची समजली जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे देखील भाजपाच्या वाटेवर अशी चर्चा दबक्या आवाजात होती. आता दोन नेत्यांची भेटच झाल्याने सभ्रमतेचे वातावरण झाले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांनी ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसमधून कोणीही फुटणार नसल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भाजपच अशाप्रकारच्या वावड्या उठवत आहे. त्यामुळे याला एवढे महत्व देण्याची आवश्यकताही नसल्याचे ते म्हणाले आहेत.
भेट ही अनऔपचारिक, त्यामुळे गैरअर्थ नको..!
सध्या गणेश उत्सव सुरु आहे. त्यानिमित्ताने राजकीय नेते हे एकमेकांच्या भेटीगाठीला जात असतातच, यामधून देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झालेली आहे. ती भेट काही उद्देशाने किंवा राजकीय हेतूने झाली असे नाही. त्यामुळे या भेटीतून कोणतेही गैरअर्थ काढू नयेत. शिवाय भाजपाला अशा भेटीतून वावड्या उठवण्याची जुनी सवय आहे. पण कॉंग्रेसमधून कोणीही फुटणार नाही, असेही पटोले म्हणाले आहेत.
सरकारची मनमानी चुकीची
शिवसेनेचा दसरा मेळावा ही गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथे शिवसेनेचाच दसरा मेळावा झाला पाहिजे. एकनाथ शिंदे हे आता सरकार आपले असल्याने अशी भूमिका घेत आहेत. पण जनाधार आणि पक्षाची परंपरा हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे.शिवाय एकाच मैदानासाठी ही स्पर्धा का असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे. शिंदे गटाकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष
कोणत्याही गोष्टीचे राजकारण केले जात आहे. हे केवळ जनेतेचे लक्ष इतर समस्यांकडे जाऊ नये यामुळेच सर्वकाही भाजपाकडून केले जात आहे. सध्या राज्यात आणि देशात शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. शिवाय दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई आणि बेरोजगारीची जबाबदारी कोण घेणार आहे. याची आकडेवारी ही भयंकर आहे. मात्र, या प्रश्नाला बाजूला सारुन केवळ राजकारण हा एकच उद्देश भाजपाचा राहिलेला असल्याचेही पटोले यांनी सांगितले.