… तर आम्ही घरी जातो, हक्कभंग प्रस्तावावरुन गदारोळ, देवेंद्र फडणवीस आक्रमक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवमानना प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली (Chhagan Bhujbal and Devendra Fadnavis verbal fight).
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवमानना प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली (Chhagan Bhujbal and Devendra Fadnavis verbal fight). भाजप साधनसुचितेचा कायमच उद्घोष करत असते, मग उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा उल्लेख करताना त्यांची बोलण्याची कोणती पद्धत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते हक्कभंग प्रस्तावाच्या मुद्द्यावर बोलत होते. यावेळी त्यांनी विधानभवनाचे नियम सांगत भाजपचे आक्षेप खोडून काढले.
छगन भुजबळ म्हणाले, “आमदार प्रताप सरनाईक आणि परिवहन मंत्री अनिल परब हक्कभंग मांडत होते त्यावेळी आपण त्यांना बोलून देखील दिलं नाही. आपण गोंधळ घातला. नियमाप्रमाणे बैठकीच्या मुदतीस कोणत्याही वेळेला विशेषाधिकाराचा प्रस्ताव उपस्थित करता येतो. त्याप्रमाणेच हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावर 20 सदस्य उभे राहिले, तर याला अनुमती आहे असं समजलं जातं. कमी राहिले तर अनुमती नाही असं समजलं जातं.”
“आमच्या नेत्यांविरोधात अपमानकारक भाष्य होत असेल आणि ते जर सर्व देशभरात ऐकलं जात असेल, तर आम्ही बोलायचं नाही का? भाजप हा साधनसुचिता मांडणारा पक्ष आहे. कशारितीने बोलावं, कशारितीने गोष्टी कराव्यात हे त्यांना माहिती आहे. पण आज ज्या पद्धतीने ते काम करत आहेत याला काय म्हणायचं? ‘ये उद्धव ठाकरे जी, ये शरद पवार जी’ ही काय बोलण्याची पद्धत आहे? हे राज्य काहीतरी साधनसुचिता पाळणारं आहे. भाजप तर साधनसुचितेचा कायम उद्घोष करते मग अशा रितीने कसे बोलतात?” असे अनेक सवाल छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
… तर आम्ही घरी जातो, हक्कभंग प्रस्तावावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
दरम्यान, याआधी देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग प्रस्ताव आणि त्यावरील चर्चेला आक्षेप घेतला होता. ते म्हणाले, “जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आम्हाला सभागृहात बोलावलं आणि दुपारी 3 वाजता चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. शिवसेनेचे आमदार एक विषय झाला की दुसरा विषय काढत आहेत, मग चर्चा 5 वाजता करा, चालू द्या ही चर्चा. कोरोना, शेतकरी असे अनेक महत्त्वाचे विषय असताना असं कसं चालेल? त्यामुळे 3 वाजल्यानंतर चर्चा करावी. आत्ता आपण ही चर्चा सुरु केली आहे तर 3 वाजता मंत्र्यांच्या उत्तरासह ही चर्चा संपवावी लागेल. चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांवर चर्चा होत नसेल, पूरग्रस्तांवर चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे कशाला बसायचं.”
भूजबळ यांच्या आक्रमक भूमिकेनंतर तात्काळ विधानसभेचं कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आलं.
संबंधित बातम्या :
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी पुन्हा शिवसेनेचा बुलंद आवाज, डॉ. नीलम गोऱ्हे यांची फेरनिवड
अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, हक्कभंग दाखल करा, सभागृहात शिवसेना आक्रमक
संबंधित व्हिडीओ :
Chhagan Bhujbal and Devendra Fadnavis verbal fight