Chhagan Bhujbal : अखेर छगन भुजबळांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला एक सकारात्मक निर्णय
Chhagan Bhujbal : मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांच्या बाबतीत एक सकारात्मक पाऊल उचललं आहे. स्वत: प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिलीय.
मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. मागच्या महिन्यात सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक अनपेक्षित निर्णय घेतला, ज्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. पक्षातील दिग्गज नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापासून महत्त्वाची पद भुषवणाऱ्या छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही. सहाजिकच याचे पडसाद उमटणं स्वाभाविक होतं. छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखद उघडपणे बोलून दाखवली. त्यांच्यासाठी ओबीसी संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केली. मंत्रिपद नको, पण पक्षाकडून मिळालेल्या वागणुकीवर छगन भुजबळ यांनी मनातील नाराजी बोलून दाखवली होती.
त्यानंतर छगन भुजबळ पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झालेल्या. छगन भुजबळ हे राज्यातील मोठे ओबीसी नेते आहेत. ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशा चर्चा सुरु झालेल्या. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच कारमधून प्रवास केला. त्यानंतर ते शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे छगन भुजबळ अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा सुरु होत्या. आता मात्र एक वेगळी बातमी आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच शिर्डीमध्ये अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. स्वत: प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिलीय. सुनील तटकरे यांची छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाली आहे. छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याचे हे संकेत मानले जात आहेत.
‘माझी पतंग कोणीही कापणार नाही’
“आता अनेकांच्या पतंगी तर कापल्या. आता आपल्या सहकाऱ्यांसोबत पतंग उडवू. माझी पतंग कोणी कापली नाही. मी या येवला मतदारसंघाचा आमदार आहे, आणि तो पाचव्यांदा आहे. माझा जन्म येवल्यातील नाही, माझे कुटुंब येवल्यातील नाही. तरी मतदारसंघातील जनतेने मला मागील २० वर्षे आणि पुढील पाच वर्षे आमदारकी बहाल केली. माझी पतंग कोणीही कापणार नाही”, असं छगन भुजबळ तीन दिवसांपूर्वी म्हणाले होते.