शरद पवार म्हणाले महाविकास आघाडी टिकेल याचा अर्थ मविआ तुटणार; शिवसेनेच्या नेत्याचं टीकास्त्र
Sanjay Shirsat on Sharad Pawar : महाविकास आघाडी, शरद पवार यांचं वक्तव्य आणि मविआचं भवितव्य; शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
छत्रपती संभाजीनगर : शरद पवार जे बोलतात त्याच्या उलटं होतं आणि शरद पवार जे बोलतात त्याच्या उलटं होतं. शरद पवार काल म्हणाले की महाविकास आघाडी टिकेल याचा अर्थ महाविकास आघाडी तुटेल, असं शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत. शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा परत घेतला. यावेळी त्यांना महाविकास आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मविआच्या भवितव्याबाबत बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षसोबत आहेत, असं म्हटलं. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांच्यावर टीका
संजय राऊत यांच्यावर शिरसाट यांनी टीका केली आहे. संजय राऊत राजकरणातला घाणेरडा किडा आहे. त्यांना त्यांची जागा नाना पाटोले यांनी दाखवली आहे. आता त्यांना फक्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जोडे मारायचं बाकी आहे. महाविकास आघाडी आता राहिली आहे का? लोकांच्या घरी मुलगा जन्मला म्हणून तुम्ही पेढे का वाटता? तुमच्या घरी जन्मल्यावर वाटा ना, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे. आता महाविकास आघाडीची सभा होणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर पट्टी आहे. त्यांना संजय राऊत सांगतील युद्धभूमीवर काय सुरू आहे ते, असंही ते म्हणालेत.
अजित पवारांवर आरोप
अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते. ते त्यांच्या पक्षाला सांभाळत होते. मी एकदा निधी मागायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षाचे नाहीत, असा आरोप शिरसाट यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे. उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणं म्हणजे साता समुद्रापार जाणं आहे, असंही ते म्हणालेत.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत. त्यावर विरोधक टीका करत आहेत. त्याला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात गेले तर काय झालं? शिवसेना-भाजपची युती आहे, युतीची सत्ता आहे. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करावं लागतं. त्यामुळे मुख्यमंत्री कर्नाटकात गेले तर त्यात चूक काय?, असा सवालही संजय शिरसाट यांनी विचारला आहे.