उध्दव ठाकरे यांची कालची सभा म्हणजे निव्वळ टाईमपास!; कुणी केली टीका?
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : रामदास आठवले यांची कॉपी करत, यमक जुळवत उध्दव ठाकरे लोकांचं मनोरंजन करतात!; कुणी डागलं टीकास्त्र? महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर कुणी केली टीका? संजय राऊतांवरही साधलाय निशाणा, वाचा सविस्तर...
छत्रपती संभाजीनगर | 28 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची काल निर्धार सभा झाली. हिंगोलीतील रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण केलं. पक्षफुटी नंतर उध्दव ठाकरे पहिल्यांदाचा हिंगोलीत गेले होते. त्यांच्या हिंगोलीतील भाषणावर शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची ही सभा म्हणजे निव्वळ टाईमपास होता, त्यांनी रामदास आठवलेंच्या स्टाईलने भाषण केलं, असं संजय शिरसाट म्हणालेत. शिवाय संजय राऊत यांच्यावरही संजय शिरसाटांनी टीका केली आहे. तसंच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरही संजय शिरसाट यांनी निशाणा साधला आहे.
कालची उध्दव ठाकरे यांची कालची सभा टाईमपाससभा होती. त्यांचे मुद्दे तेच होते. पण स्टाईल फक्त वेगळी होती. उद्धव ठाकरे सध्या रामदास आठवले यांची कॉपी करत आहेत. यमक जुळवत आहेत. त्यामुळे लोकांनी ही सभा एन्जॉय केली, असं संजय शिरसाट म्हणालेत. उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे यांचा दाढीवाला असा उल्लेख केला होता. त्याला शिरसाटांनी उत्तर दिलं आहे. दाढीला वॉशिंग पावडर हे पण टोमणे आहेत. काय काम केलं हे सांगू शकले नाहीत. त्यामुळे फक्त दोन तीन लोकांना टार्गेट करायचं काम सुरू आहे, असंही संजय शिरसाट म्हणालेत.
शासन आपल्या दारी थापा नाहीत. तर लोकांसाठी हा उपक्रम आहे. सरकारची काम त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात. लोकांना काही ना काही मिळत आहे. गरिबांना मिळणाऱ्या मदतीची चेष्टा उध्दव ठाकरे करत आहेत. लोक तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्हाला लोकांची सहानुभूती मिळणार नाही, असं संजय शिरसाट म्हणालेत.
संजय राऊत हा भोंगळा माणूस आहे. त्याच्या नादी कशाला लागायचं? या फाटक्या तोंडाला महाराष्ट्र वैतागला आहे. संजय राऊत काऊंटर करण्यासारखा नाही. मुख्यमंत्री गुजरातला जातील किंवा दिल्लीला जातील. यावरून संजय राऊतला काय करायचं आहे? आम्ही राहुल गांधींची गळा भेट तर घेत नाहीत. युतीचे संबंध चांगले ठेवण्यासाठी आम्ही भेट घेत असतो, असा टोलाही शिरसाटांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे मातोश्रीवरून सिल्व्हर ओकवर जातात आणि बाजूच्या सोफ्यावर बसतात. मुख्यमंत्री गुजरातला जाणार म्हटलं की टीका करतात. एकनाथ शिंदे काही शिवसेना पक्षप्रमुख नाहीत. ते जाऊ शकतात. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री भूमिका घेत असतील तर त्यात चूक काय?, असं सवाल संजय शिरसाटांनी विचारला आहे. वज्रमुठ सभेत शरद पवार कधीही आले नाहीत. दुसऱ्यावर टीका करण्याआधी स्वतःची लायकी तपासावी, असंही ते म्हणाले.