मुहूर्त ठरला, मोदी आणि अमित शाहांच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजप प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या भाजप (BJP) प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब (Chhatrapati Udayanraje Bhosale Join BJP) झाला आहे. येत्या 14 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भाजपात जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. अखेरीस त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे.
विशेष म्हणजे आज (12 सप्टेंबर) सकाळी उदयनराजेंनी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उदयनराजे यांच्या घरी त्यांची भेट (Chhatrapati Udayanraje Bhosale Join BJP) घेतली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. उदयनराजेच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीनंतर उदयनराजेंचं मनपरिवर्तन होईल आणि ते भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांची मनधारणी करण्यात राष्ट्रवादीच्या दिग्गज नेते अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान येत्या 15 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेचे साताऱ्यात आयोजन केले आहे. त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह उदयनराजेही उपस्थित असण्याची शक्यता आहे.
उदयनराजेंच्या अटी काय?
उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा दिल्लीत होईल हे यापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. पण उदयनराजेंच्या आणखी काही अटी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार,
- सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच व्हावी
- पोटनिवडणुकीत अपेक्षित निकाल न आल्यास राज्यसभेवर नियुक्ती
राष्ट्रवादीचे मनधरणीचे प्रयत्न
उदयनराजेंनी पक्ष सोडू नये यासाठी राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उदयनराजे जाणं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. फक्त साताऱ्यातच नव्हे, तर राज्यभरात उदयनराजेंचा स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादीला फायदा होईल. यासाठी राष्ट्रवादी विविध माध्यमातून उदयनराजेंची मनधरणी करत आहे.
याआधी उदयनराजे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही प्रयत्न केले होते. मात्र, त्यात यश आलं नाही. आता पुन्हा उदयनराजे शरद पवार यांच्या भेटीला जात असल्यानं त्यांच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप प्रवेश लांबणीवर
गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडल्याचीही चर्चांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 2 तास चर्चा केली होती. पण उदयनराजेंच्या काही अटींवर ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. त्यानंतर उदयनराजेंनी सोमवारी (9 सप्टेंबर) कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मंगळवारी (10 सप्टेंबर) लगेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते.