Assembly Election 2022 : सुरक्षित मतदानासाठी कोविड गाईडलान्सही जारी! निवडणूक आयोगाचे काय निर्देश?
कोरोना काळात पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यासोबत ज्येष्ट नागरीकांसह दिव्यांगांसाठी निवडणूक आयोगानं मतदानासाठी खास खबरदारी घेतली आहे.
नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचा दावा केला जात असतानाच आज नवी दिल्लीतून महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली. पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा फटक बसल्यामुळे निवडणुका घेणं आव्हानात्मक आहे, हे देखील मुख्य निवडणूक आयुक्तांनी मान्य केलं. शिवाय महत्त्वाचे निर्देशही जारी केलेत. या निर्देशांनुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मतप्रक्रिया पार पडणं हे सहज आणि सुरक्षित असावं, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
काय उपाययोजना केल्या आहेत?
कोरोना प्रार्दुभाव आणि नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे नवी नियमावली जारी केली असून मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरची सोय केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेत सगळे अधिकारी कर्मचारी लसीकरण झालेले असतील तसंच निवडणूक कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देणार येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी मतकेंद्रावर निर्जंतुकीकरणही केलं जाणार आहे.
कोणत्याही मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी मतकेंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आली आहे. मागील निवडणुकांच्या तुलनेत 16 टक्क्यांनी मतदान केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी विशेष मतकेंद्रही उभारली जातील, असंही सांगण्यात आलंय.
सनदी अधिकारी निवडणुकीच्या दरम्यान बारीक लक्ष ठेवून असणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी जास्तीचे अधिकारी लागले, तर त्यांचीही नियुक्त केली जाईल, यासाठीचीही तयारी निवडणूक आयोगानं ठेवली आहे. तसंच अवैध पैसे, अवैध दारु, यांचं वितरणावर कडक कारवाई होईलच. पण या गोष्टी घडूच नयेत, यासाठी खबरादारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनही मुबलक संख्येत तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी फ्रन्टलाईन वर्कर्स मानले जातील. तसंच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण झालेले असणार. तसंच त्यांना बुस्टर डोसही दिला जाणार. सर्व मतदान केंद्र सॅनिटाईज केली जाणार, असल्याचीही माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी दिली.
कोरोना रुग्णांसाठी काय विशेष ?
कोरोना काळात पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यासोबत ज्येष्ट नागरीकांसह दिव्यांगांसाठी निवडणूक आयोगानं मतदानासाठी खास खबरदारी घेतली आहे. 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोरोना रुग्णांना पोस्टल मतदान करता येणार आहे.
नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात पत्रकार आज मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यासोबतच कोविड मार्गदर्शक तत्त्व नेमकी काय असणार आहेत, याबाबतची सविस्तर माहिती दिली. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ऑफलाईन प्रचारावरही मोठ्या प्रमाणात बंदी घालण्यात आली आहे.