मी कंत्राटी मुख्यमंत्री, शेतकऱ्यांच्या हिताचं कंत्राट मी घेतलंय
आजचा दिवस ऐतहासिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणारे कार्यकर्ते आहोत. 33 देशांनी उठावचं कौतुक केलं, दखल घेतली.
दिल्ली / संदिप राजगोळकर (प्रतिनिधी) : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेना राज्यप्रमुख आणि पदाधिकारी मेळावा (Melava) पार पडला. यावेळी धनुष्यबाण, शाल, श्रीफळ देऊन राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर कंत्राटी मुख्यमंत्री अशी टीका करण्यात आली होती. यावर शिंदे यांनी दिल्लीतील मेळाव्यात प्रत्युत्तर दिले आहे. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री (Contract Chief Minister) आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. शेतकरी हिताचे कॉन्ट्रॅक्ट मी घेतलं आहे. महिला सन्मानाचं कंत्राट घेतलं आहे. आम्ही तुम्हाला कामातून उत्तर देवू. राज्य पुढे नेण्याचं कंत्राट दिलं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आजचा दिवस ऐतहासिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणारे कार्यकर्ते आहोत. 33 देशांनी उठावचं कौतुक केलं, दखल घेतली.
बाळासाहेब आणि मोदींचा फोटो लावून मते मागितली अन्…
बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून आम्ही मते मागितली. शिवसेना-भाजपची युती होती. जनतेने आम्हाला शिवसेना-भाजप म्हणून निवडून दिले. त्यांच्या सोबत सरकार स्थापन करण्याची आवश्यकता होती. पण सरकार स्थापन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्थापन केले.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात आम्ही वर्षानुवर्षे लढलो. बाळासाहेब म्हणाले होते, काँग्रेस-राष्ट्रवादी आपले शत्रू आहेत. त्यांना कधीही जवळ करता कामा नये. त्यांना जवळ करण्याची वेळ आली तर मी पार्टीचे काम बंद करेन.
खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपला दूर केले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. तेव्हा सर्व लोकांनी तेव्हा विरोध केला होता. पण बाळासाहेबांची परंपरा आम्ही आदेश मानणारे लोक होतो. त्यामुळे आम्ही बोललो वरिष्ठांनी निर्णय घेतलाय, पाहूया काय होतंय.
अडीच वर्षात काय झालं ?
सरकार आमचं, मुख्यमंत्री आमचा आणि आमचे लोक तुरुंगात जाताहेत. आमचे लोक तडीपार होताहेत, आमचे लोक मोक्कामध्ये जाताहेत. ज्यांनी जबाबदारी निभवायला पाहिजे होती त्यांनी काय केलं ?
मी अनेकांना मदत केली, करतो. अन्याय सहन करायची एक मर्यादा असते. आम्ही जर चुकीचं काम केलं असत तर, आज मी जिथं जातो तिथं लाखोंची गर्दी होते. आमची भूमिका बाळासाहेब यांच्या विचारांना पुढं घेऊन जाणारी आहे. बाळासाहेब यांनी कधी आपली भूमिका बदलली नाही.
आम्ही उठाव केला म्हणून गटप्रमुख, पदाधिकाऱ्यांना चांगले दिवस
गटप्रमुख मेळावा सुरू आहे. अडीच वर्षे गटप्रमुखांची आठवण आली नाही. अडीच वर्षांनी गटप्रमुखांची आठवण झाली. अडीच वर्षात त्यांना काडीची किंमत दिली नाही. त्यांना वर्षावर येऊ दिले नाही, मातोश्रीवर येऊ दिले नाही.
आम्ही उठाव केला म्हणून गटप्रमुख आणि पदाधिकारी यांना चांगले दिवस आलेत. आम्हाला गद्दार म्हणताय, तुम्ही हिंदुत्व सोडलं, मग गद्दार कोण ? गद्दार कोण, खुद्दार कोण हे जनता जाणते. मी द्यायचं काम करतो.
काही लोकं फक्त घ्यायचं काम करतात. मला मोदी, शाह आणि जनतेने मुख्यमंत्री पदावर बसवलं. खोके बोलताय, वेळ आल्यावर मी बोलेन. विधानसभा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा तुम्ही म्हटलं सर्व पर्याय खुले आहेत.
आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे
मी सांगितलं भाजपसोबत जायला हवं. काम खूप चांगलं केलं असं ते सांगतात. माझ्यासोबत अनेक जण होते. आम्ही लोकांनी जो निर्णय घेतला तो जनतेचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे आपला मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं. आज मला मिंधे गट बोललं जात आहे, आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे आहोत. आम्ही तीन महिन्यापूर्वी तुम्हाला आकाश दाखवलं आहे, असे खडे बोल शिंदेंनी सुनावले.