Ambadas Danve | होय.. अंबादास दानवेंना मी फोन केला होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं…
आदित्य ठाकरे यांचा 22 आणि 23 जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यात दौरा आयोजित करण्यात आला आहे. उद्या दुपारपासून वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद मध्य मतदार संघात आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधतील.
मुंबईः आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) आज औरंगाबाद जिल्ह्यात भेटी-गाठी घेत आहेत. यावेळी त्यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच गाजतंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मलाही फोन आला होता. मी तुझ्यासाठी हे केले, ते केले वगैरे..असं एकनाथ शिंदेंनी सुनावल्याचा दावा अंबादास दानवेंनी केला. दानवेंच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदेंचा फोन खरंच दानवेंना आला होता का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. आगामी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवांसाठीच्या नियमावलीसंदर्भात शिंदेंनी काही घोषणा केल्या. यावेळी पत्रकारांनी दानवेंनी केलेल्या वक्तव्याची पुष्टीच केली. एकनाथ शिंदेंना विचारलं, तुम्ही खरंच दानवेंना फोन केला होता का? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्टच उत्तर दिलं..
होय मी फोन केला होता..
पत्रकार परिषदेत उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘होय, मी अंबादास दानवेला फोन केला होता. पण आमच्यासोबत यायला नाही. आमच्यासोबतच्या आमदारांच्या पत्नीला आणि मुलांना अंबादास दानवे फोन करत होते. आमदारांना सांगा मला फोन करा म्हणून. म्हणून मी त्याला फोन केला. तू काय आमदारांचा बॉस आहे का बाबा, तुला काय अधिकार दिला आहे का त्यांना सांगायला.
अंबादास दानवेंचा दावा काय?
वैजापूर येथील शिवसैनिकांना उद्देशून बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मी तुझ्यासाठी हे केलं, ते केलं, असे सांगणारे फोन तुम्हाला येतील. पण कुणी तुमच्यावर उपकार करीत नाही. मलाही एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. मला म्हणाले, ‘मी तुझ्यासाठी हे केले.. ते केले…’ पण मी उत्तर दिले, शिवसेना म्हणून तुम्ही ते केले. उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून तुम्ही मदत केली होती. उपकार नाही केले. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे… असे मी ठणकावून सांगितल्याचं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं.
उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा, दानवे-खैरेंवर भिस्त
आदित्य ठाकरे यांचा 22 आणि 23 जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यात दौरा आयोजित करण्यात आला आहे. उद्या दुपारपासून वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद मध्य मतदार संघात आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधतील. विशेष म्हणजे औरंगाबादमधील ज्या मतदारसंघाचे आमदार फुटलेत, तेथेच आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा ठेवण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंमुळे औरंगाबाद शिवसेनेत उभी फूट पडली असून येथील डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. औरंगाबादचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यावरच येथील पक्षसंघटन वाढवण्याची खरी भिस्त आहे.