मी बोलत नाही तरी तुम्ही का एवढं बोलता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री आणि आमदारांना झापले
एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्री आणि आमदारांवर नाराजी व्यक्त केली.
मुंबई : शिंदे गटाचे वाचाळवीर मंत्री आणि आमदार हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Chief Minister Eknath Shinde) यांच्यासाठी डोके दुखी बनले आहेत. मंत्री तानाजी सावंत यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच अनेक आमदार टीका करताना वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. या वाचळवीरांना आवर घालण्यासाठी एकनाथ शिंदें यांनी त्यांना दमच भरला आहे.
शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्री आणि आमदारांवर नाराजी व्यक्त केली.
मी बोलत नाही तरी तुम्ही का एवढं बोलता? असा सवालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी वाचाळवीर मंत्री आणि आमदारांना विचारला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत कान टोचले आहेत.
पक्ष चिन्हाबाबत विनाकारण भाष्य करु नका. वादग्रस्त वक्तव्य करु नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना केल्या आहेत.
शिंदे गटाचे मंत्री हे सातत्याने विरोधकांवार विशेषत: शिवसेनेवर टीका करत आहेत. यामुळे त्यांनी केलेली वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहेत.
दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिंदे गटातील मंत्र्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळ बैठकीतच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना झापले होते.
अब्दुल सत्तार यांनी राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस चांगलेच संतापले. थेट मंत्रीमंडळ बैठकीत फडणवीस यांनी सत्तार यांना खडसावले होते.