ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण, चित्र वाघ यांनी आयुक्तांवरील दबावाचे आरोप फेटाळले, ठाकरे गटाच्या टीकेला सडेतोड उत्तर
सध्या ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : सध्या ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्या राजीनाम्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शिंदे, फडणवीस सरकारने महापालिका आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात आहे. दुसरीकडे मात्र भाजपाने (BJP) हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. लटके यांच्या राजीनाम्याबाबत महापालिका आयुक्तांवर कसलाही दबाव नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
आरोप फेटाळले
चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. लटके यांच्या राजीनाम्याबाबत महापालिका आयुक्तांवर कुठलाही दबाव नाही. याबाबत महापालिका आयुक्तांनी स्वत:च स्पष्ट केलं आहे. त्यांनी आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नसल्याचं म्हटलं आहे. राजीनाम्याची जी तीस दिवसांची प्रक्रिया असते ती प्रक्रिया आयुक्त सध्या फॉलो करत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे नेमके आरोप काय?
ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळावी नाही यासाठी शिंदे सरकारने राजीनामा मंजूर न करण्यासाठी आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर घणाघात केला. लटके यांनी नियमानुसार तीन ऑक्टोबरलाच राजीनामा दिला होता. तसेच महापालिकेच्या संबंधित विभागाकडे नियमानुसार एका महिन्याचा पगार देखील जमा करण्यात आला होता. मात्र तरी देखील लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परंतु दुसरीकडे चित्रा वाघ यांनी हे आरोप फोटाळून लावले आहेत.