CM Eknath Shinde : अजितदादांना विचारलंय का तुम्ही?, मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर मुख्यमंत्र्यांचं जयंत पाटील यांना काय उत्तर?
CM Eknath Shinde : दादा तुम्ही तेव्हा थोडी घाई केली. थोडी माहिती असती तर करेक्ट झाला असता. मला त्यावेळी प्रमुखाचा फोन आला अरे टीव्ही पाहिली का? ते म्हणाले, जयंत राव फोन उचलत नव्हते. जयंत राव तुम्ही असता तर कार्यक्रम ओके झाला असता.
मुंबई: मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रीपद दिल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही या बाजूला या. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ. तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यास आमच्याकडून कुणाचीच हरकत नाही, असं राष्ट्रवादीचे (ncp) नेते जयंत पाटील (jayant patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना उद्देशून म्हटलं होतं. पाटील यांनी भर विधानसभेत थेट शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जयंत पाटील यांच्या या ऑफरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार टोलेबाजी केली आहे. अजितदादांना विचारलंय का तुम्ही? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटलांना लगावताच एकच खसखस पिकली. तसेच तुम्हाला तर विरोधी पक्षनेते व्हायचं होतं. पण झालात का तुम्ही? असं म्हणत जयंत पाटलांच्या सुप्त राजकीय इच्छेलाही शिंदे यांनी हात घातला.
आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो असं तुम्ही मला म्हणाला. तुम्ही दादांना विचारलं का? विरोधी पक्षनेते तुम्हाला व्हायचं होतं. झाला का तुम्ही? खरं आहे की नाही? ते कालच्या भाषणातून दिसत होतं. असू द्या. बघा. दादा, दादा आहेत. त्यांची दादागिरी कायम चालणार. ते आमचे मित्र आहेत. तुम्हीही मित्रं आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
पण तुम्ही आम्हाला बोचेल असं बोलत होतात
तुमचं काम मी केलं नाही का? तुमचं एकही काम केलं नाही, असं एक तरी काम सांगा. प्राजक्तला निधी दिला. प्राजक्त बोलणारच नाही. त्याला माहीत आहे अजून काम करायचं आहे. तुम्ही मनाने चांगले आहात. काल हलकं फुलकं वातावरण व्हायला हवं होतं. हे वातावरण करताना तुम्ही आम्हाला बोचेल असं बोलत होतात. काल मोक्का मोक्का बोलत होते. आमच्या सचिन कुवळेकरला मोक्का लावला. ते किती ओक्साबोक्सी रडत होते. नंतर तुमचेच माणसं गेले आणि त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. तुम्ही असं केलं नाही. पण अशा घटना घडल्या आहेत, असंही ते म्हणाले.
दादा, आण्ही तुमचा टाईम टेबल फॉलो करतो
दादा तुमच्या ही आमदारांवर आमच लक्ष आहे. त्यांनाही मदत करु. तुम्ही महाविकास आघाडीची बांधली होती मोट, मुख्य बसले होते घरी आणि तुम्ही चालवत होते बोट, अशी कविता करत त्यांनी टोलेबाजी केली. दादा काल तुम्ही म्हणाला आमदार कसे गेलेत? दादा या आमदाराकडे आम्ही लक्ष देतोय. तुमच्याही आमदारांवर आमचे लक्ष आहे. दादा जे केले ते आम्ही उघड केले आहे. आम्ही श्रद्धा सबुरीने वागतो आहोत. आम्ही दादा तुमचे टाइम टेबल फॉलो करतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
जयंतराव तुम्ही कार्यक्रम ओके केला असता
दादा तुम्ही तेव्हा थोडी घाई केली. थोडी माहिती असती तर करेक्ट झाला असता. मला त्यावेळी प्रमुखाचा फोन आला अरे टीव्ही पाहिली का? ते म्हणाले, जयंत राव फोन उचलत नव्हते. जयंत राव तुम्ही असता तर कार्यक्रम ओके झाला असता. जयंतराव जे ऑपेरेशन करतात त्यात माणसाला दुखत नाही सगळं काढून घेतात, असा चिमटाही त्यांनी काढला.