Maharashtra Assembly Session : शिंदेंवरच आमदारांचा ‘विश्वास’, 164 मतांनी विश्वास ठराव जिंकला; आता राज्यात ‘शिंदेशाही’ सुरू
Maharashtra Assembly Session : आज सकाळी 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू झालं. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शिंदे-फडणवीस सरकारने जिंकल्यानंतर आजच्या विश्वासदर्शक ठरावाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची विधानसभेत अग्नीपरीक्षा होती. शिंदे सरकार विश्वास ठराव जिंकणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, शिंदे सरकारवरच सभागृहातील आमदारांनी विश्वास दाखल केला. शिंदे यांनी 164 मतांनी विश्वास ठराव जिंकला. विश्वासमताच्या बाजूने 164 मते पडली. तर विश्वास ठरावाच्या विरोधात 99 मते पडली. तर कालच्या प्रमाणे आजही चार आमदार तटस्थ राहिले. कालच्यापेक्षा आज विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आघाडीला 8 मते कमी पडली. एकनाथ शिंदे यांनी विश्वास ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी बाके वाजवून त्यांचं स्वागत केलं. विश्वास ठराव जिंकल्यानंतर आता शिंदे सरकार अडीच वर्षासाठी आपला कारभार करणार आहे. विश्वास ठरावाच्या आधी आज शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे (shivsena) आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेची साथ सोडून आज शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
आज सकाळी 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू झालं. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शिंदे-फडणवीस सरकारने जिंकल्यानंतर आजच्या विश्वासदर्शक ठरावाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर आवाजी मतदान घेतलं. नंतर सभागृहाचे दरवाजे बंद करून मतदानास सुरुवात केली. यावेळी शिंदे गटाला 164 मते पडली. तर विश्वासमताच्या विरोधात 99 मते पडली. आजही एमआयएम आणि सपाचे मिळून चार सदस्य तटस्थ राहिले.
आदित्य ठाकरे आवाजीला गैरहजर
विधानसभेचं कामकाज बरोबर 11 वाजता सुरू झालं. त्यावेळी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे सभागृहात हजर नव्हते. आदित्य ठाकरे उशिरा सभागृहात पोहोचले. तोपर्यंत आवाजी मतदान झालं होतं. विधानभेचे दरवाजे बंद होत असतानाच ठाकरे सभागृहात आले.
शेवटचा धक्का
गेले 13 दिवश एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला धक्क्यावर धक्के दिले. आजही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना शेवटचा धक्का दिला. गेली 13 दिवस शिवसेनेसोबत ठामपणे उभे राहणारे, शिवसेनेच्या प्रत्येक बैठकांना हजर राहणारे आणि बंडखोरांवर जहरी टीका करणारे शिवसेनेचे हिंगोलीतील आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाकडील शिवसेना आमदारांची संख्या 40 झाली आहे.
अध्यक्षही भाजपचाच
काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर उभे होते. तर शिवसेनेकडून राजन साळवी उभे होते. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली. तर साळवी यांना फक्त 107 मते मिळाली. तसेच समाजवादी पार्टी आणि एमआयएमचे तीन आमदार तटस्थ राहिले.