पंतप्रधान मोदींच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही; नारायण राणेंचा घणाघात
दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ बरळणं होतं. | Narayan Rane
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. एवढेच नव्हे तर हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठीही लायक नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ बरळणं होतं. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने कसं बोलावं, याचं उद्धव ठाकरेंना भान नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. (Naryan Rane take a dig at CM Uddhav Thackeray)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा अक्षरश: पाणउतारा केला.
कालचा दसरा मेळावा म्हणजे 47 शिवसैनिकांमध्ये झालेली भव्य सभा होती, असा उपरोधिक टोला राणेंनी लगावला. आजवर महाराष्ट्रात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्याने आणि भाषणशैलीने देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला सध्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेत. तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करतात. मोदींच्या धोरणावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळावा, असे नारायण राणे यांनी सांगितले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
संंबंधित बातम्या:
कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, नारायण राणेंचा सवाल
(Naryan Rane take a dig at CM Uddhav Thackeray)