संभाजी ब्रिगेड-भाजप युतीवर भाष्य, पुरुषोत्तम खेडेकर यांचा लेख जसाच्या तसा!
संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगेडला खूप मर्यादा येतात. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपशी युती हाच पर्याय उरतो. तसं संभाजी ब्रिगेडपेक्षा वेगळ्या अर्थानं भाजपला अस्पृश्य मानले जाते.
मुंबई : मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या लेखाने राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. टोकाचा विरोध असलेल्या भाजपसोबत युती करण्याचं भाष्य पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलं आहे. भाजपसोबत युती हाच पर्याय असं पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये भाजपसोबतच्या युतीची भूमिका मांडली.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या लेखात नेमकं काय म्हटलंय?
कुणबी मराठा बहुजन समाजातील स्थिरस्थावर बंधू-भगिनींनी सामाजिक बांधिलकी व कृतज्ञता म्हणून गरजवंतांना कौशल्य, बुद्धी, श्रम, पैसा व वेळ खर्च करून त्यांना आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य करावे, अशी मराठा सेवा संघाची संकल्पना आहे, हेच तत्व आहे. परंतु अलीकडे या कामात शिथिलता आली आहे, असं लक्षात येतं. हे कार्य सर्वांगाने गतिमान करून नव्याने समाज उभा करणे आवश्यक आहे. पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात आले पाहिजेत.
महिलांना आकर्षित करण्यासाठी भविष्यकाळात ऊर्जेची गरज आहे. नवीन अधिकारी मराठा सेवा संघाचे काम करण्यास इच्छुक आहेत पण ते काही कारणामुळे मिळू शकलेले नाहीत. त्यांना जोडणे आवश्यक आहे.संवाद व संपर्क वाढविणे, आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी धडपड सुरु केली पाहिजे. पैशाचे सोंग करता येत नाही. शातून सत्ता व सत्तेतून पैसा असे विचित्र समीकरण झाले आहे. हे बदलायचे असेल तर संभाजी ब्रिगेड राजसत्तेत आणणे गरजेचे आहे.संभाजी ब्रिगेडचे राजसत्ता काबीज करण्याचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी राजनैतिक संबंध वाढवले पाहिजे याबाबत गंभीरपणे विचार करावा लागेल.
महाआघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिगेडला दूर ठेवून केवळ त्यांच्या नावाचा व कामाचा एकतर्फी लाभ घेणे आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहीत धरून आहेत. भाजपा सत्तेत आली तरी हरकत नाही पण संभाजी ब्रिगेड सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे ही या तिन्ही पक्षांची मानसिकता आहे.
शेवटी भाजपशी युती हाच पर्याय
तर काही लहान पक्ष नेते संभाजी ब्रिगेड बाबत गैरसमज पसरवत असतात. या परिस्थितीत संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगेडला खूप मर्यादा येतात. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपशी युती हाच पर्याय उरतो. तसं संभाजी ब्रिगेडपेक्षा वेगळ्या अर्थानं भाजपला अस्पृश्य मानले जाते. मराठा सेवा संघ व आरएसएस यांची विचारसरणी पूर्णपणे परस्परविरोधी आहे. ते चित्र तसेच राहील परंतु राजकारणात अंतिम यश मिळविणे हेच एकमेव तत्त्व असते. “जो जिता वही सिकंदर…: राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी जी किल्ली उपयोगी पडेल ती वापरली पाहिजे.राजकारणात आपला स्वार्थ आणि हित हेच अंतिम उद्दिष्ट असते.तिथे कोणीही कायमस्वरूपी मित्र व शत्रू नसतात.वेळ व संधी हेच राजकीय सत्य आहे. लोक काय म्हणतील यावर राजकारण केले जात नाही.
राजकारण असंच चालतं
शिवसेना व भाजप आज राणे प्रकरणामुळे एकमेकांचे कट्टर शत्रू झाले आहेत असे वाटते. पण सोन्याचे अंडे देणारी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी ते पुन्हा एकत्र येऊ शकतात… त्यासाठी तडजोड होऊ शकते… राजकारण असंच चालतं… ज्येष्ठांना विनंती आहे की कृपया संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करा व भावनिक होऊन कालबाह्य झालेले राजकारण टाळले पाहिजे… इस्राईलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे… त्यातील एक पक्ष मुस्लिम पक्ष आहे… आघाडी सरकार 3 परस्पर विरोधी पक्षांचे बनलेले आहे. गेल्या पन्नास वर्षात एकमेकांचे कट्टर विरोधक सोयीनुसार एकत्र येऊन राजकारणात सत्ता हस्तगत करत आहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे. शरद पवारांचे पुलोद, मोरारजी देसाई यांचा जनता पक्ष, मायावतींचा बसपा,आणि भाजपचे उत्तर प्रदेश सरकार, मनमोहन सिंग यांचे यूपीए तर महाराष्ट्रातील सध्याचे महाविकास आघाडी सरकार ही काही युती आघाड्यांची उदाहरणे आहेत.
संभाजी ब्रिगेडचे ब्राह्मणविरोधी कार्य चालू राहील
आता स्वबळावर राजकारण हे मत भूतकाळात जमा झाले आहे. पहिले प्राधान्य समविचारी पक्षांना. आपला स्वाभिमान सांभाळून देणे याबाबत दुमत नाही पण जमलेच नाही तर परस्पर विरोधी पक्षासोबत युती व वाटाघाटी करून योग्य निर्णय घ्यावा लागतो… राज्यशास्त्राच्या तत्त्वानुसार प्रथम पूर्ण ताकदीनिशी पायवाट तयार करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते अशी पायवाट विरोधी भूमीत सोपी असते… कारण समविचारी पक्षांसोबत काम करताना वाढीसाठी खूप मर्यादा येतात तर विरोधकांनाही आधार आवश्यक असतोच.. गरजवंताला आधार पाहिजे असतो… तसेच परस्पर विरोधी तत्व सामाजिक स्वरूपात असतात ते कोणत्याही परिस्थितीत व कोणीही सोडत नाहीत… उदाहरणार्थ संभाजी ब्रिगेडचे ब्राह्मणविरोधी कार्य चालू राहील याची खात्री बाळगावी… इथे युती-आघाडी राजकीय असते… सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व आर्थिक नाही. गेल्या काही वर्षांपासून अनेक तत्ववादी मोठे मोठे राजकीय नेते तसेच पक्ष आदर्श गुंडाळून राजकारण साधत आहेत. आज तरी संभाजी ब्रिगेडला सत्ता प्राप्तीसाठी काही ना काही तडजोड करावीच लागेल याबाबत गंभीरपणे विचार करून योग्य भूमिका आणि निर्णय घ्यावे ही सूचना आहे.
संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षांना जबरदस्त पर्याय
मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जून तनपुरे सर व महासचिव इंजि मधुकरराव मेहेकरे यांनी विशेष परिश्रम घेत संभाजी ब्रिगेडचे राजकारण यशस्वी होण्यासाठी राजनैतिक आखणी करावी अशी अपेक्षा आहे. मतदारांना बदल पाहिजेत परंतु त्यांना अपेक्षित पर्याय उपलब्ध करून दिला जात नाही. माझ्या मते संभाजी ब्रिगेड हा सर्वच राजकीय पक्षांना जबरदस्त पर्याय आहे. संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते यांनी आपली सर्वच ताकद वाढवलीच पाहिजेत. व्यावसायिक व व्यावहारिक पद्धतीने मैदानात उतरले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध कौशल्याचा वापर करून युद्धे जिंकली होती. आज छत्रपती शिवाजी महाराज आले तरी त्यांनाही लोकशाही मार्गानेच निवडणूक लढवून जिंकावी लागेल. बहुसंख्य पाठबळावर मुख्यमंत्री वा प्रधानमंत्री वा महापौर इत्यादी अधिकार पदे हस्तगत करावी लागतील याची नोंद घ्यावी. आता ढाल तलवारीचा वापर बंद आहे. मतदारांना विश्वास दिला पाहिजेत. निवडणुका जाहीर होण्याची वाट न पाहता याच क्षणापासून उमेदवार व पक्षाने मैदानात उतरले पाहिजेत अशी सूचना आहे. खूप खूप सदिच्छा. www.tv9marathi.com
दहा नगरसेवक मुंबई मनपात पाठवा
डिसेंबर २०२१ नंतर विविध स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका व विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका अपेक्षित आहेत. कोणत्याही परिस्थितीत संभाजी ब्रिगेडचे कमीत कमी दहा नगरसेवक मुंबई महापालिका मध्ये निवडून आलेच पाहिजेत. तसेच २०२४ लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी केली पाहिजेत. स्वबळावर वा युतीत जास्तीत जास्त लोकसभा व विधानसभा जागा जिंकल्या पाहिजेत. संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी पुढील काळात फक्त आणि फक्त शंभर टक्के राजकारण करावे कारण राजकारण हेच समाजकारणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. मराठा सेवा संघ वर्धापनदिन निमित्ताने खूप खूप अभिनंदन व सर्व पातळ्यांवर राजसत्ता वाटा हस्तगत करण्यासाठी सदिच्छा.
– अॅड. पुरुषोत्तम खेडेकर, चिखली
संबंधित बातम्या
पुरुषोत्तम खेडेकरांची ऑफर आधी बघू, संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया!
‘भाजपशी युती हाच पर्याय’, संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भूमिका 360 अंशात बदलली?