पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोला दिल्या लिखित शुभेच्छा, शुभेच्छांची प्रत ‘टीव्ही 9 मराठी’कडे; मोदी नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोल लिखित शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्यांची अभिप्राय प्रत 'टीव्ही 9 मराठी'ला प्राप्त झाली आहे. पुणे मेट्रो आजपासून सुरू झाल्याचा आनंद होत असल्याचे मोदींनी आपल्या अभिप्रायमध्ये म्हटले आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन पार पडलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट (Metro Ticket) काढलं आणि पुणे मेट्रोचा प्रवास करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले प्रवासी ठरले. गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला. तत्पूर्वी मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडाही दाखवला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोल लिखित शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्यांची अभिप्राय प्रत ‘टीव्ही 9 मराठी’ला प्राप्त झाली आहे. पुणे मेट्रो आजपासून सुरू झाल्याचा आनंद होत असल्याचे मोदींनी आपल्या अभिप्रायमध्ये म्हटले आहे.
नेमके काय म्हटले नरेंद्र मोदींनी आपल्या अभिप्रायमध्ये?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन पार पडलं. त्यानंतर त्यांनी मेट्रोलो लिखित शुभेच्छा देखील दिल्या आहेत. पुणे मेट्रो आजपासून सुरू झाली आहे. पुण्यात मेट्रो सेवा सुरू झाल्याने मला आनंद होत आहे. मेट्रोद्वारे पुणेकरांना सुरक्षित आणि स्वस्त प्रवासाचा अनुभव घेता येईल. स्वस्त आणि सुरक्षीत प्रवासाठी मी पुणेकरांचे अभिनंदन करतो. तसेच मेट्रोच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांचे कौतुक
दरम्यान मेट्रोच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील कौतुक केले. पुणे मेट्रोसाठी त्यांनी कसा तगादा लावला, असे हसत-हसत सांगितले. त्यावर फडणवीसही गालातल्या गालात हसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मट्रोसाठी देवेंद्र फडणवीस यांनी कसे योगदान दिले याचे जाहीर कौतुक आपल्या भाषणातून केले. मोदी म्हणाले की, पुण्याने शिक्षण, संशोधन, आयटी, बिझनेसमध्येही आपली ओळख मजबूत केली आहे. अशात आधुनिक सेवा सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहेत. आमचे सरकार पुण्याची गरज ओळखून काम करते आहे. मी आज आनंदनगरपर्यंत प्रवास केला. ही मेट्रो पुण्यातील मोबिलिटी अधिक सोपी करेल. प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होईल. राहणे आणखी सोपे होईल, असा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा ते या प्रोजेक्टला घेऊन सारखे दिल्लीला यायचे. खूप मागे लागले होते, या प्रोजेक्टसाठी. त्यांच्या प्रयत्नांचेही हे यश आहे. त्यांचेही अभिनंदन, म्हणत त्यांनी फडणवीसांचे कौतुक केले.