Rajyasabha Election : राज्यसभेसाठी बाहेरचा उमेदवार लादल्याने काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, सरचीटणीस आशिष देशमुखांचा राजीनामा
नाराजी दूर करण्याचं आव्हान आता काँग्रेससमोर असणार आहे. ‘परराज्यातील उमेदवार महाराष्ट्रावर लादने हा महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय आहे’ असे मत यावेळी आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
नागपूर : राज्यसभेसाठी (Rajyasabha Election) काँग्रेसने (Congress) उत्तर प्रदेशातील नेते इम्रान प्रतापगडी (Imran Pratapgarhi) यांना उमेदवरी दिली. मात्र आता त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू झालंय. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी यावरून नाराजी व्यक्त करत थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.प्रदेश काँग्रेस सरचीटणीस पदाचा राजीनामा त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांना पाठवला आहे. त्यामुळे ही नाराजी दूर करण्याचं आव्हान आता काँग्रेससमोर असणार आहे. ‘परराज्यातील उमेदवार महाराष्ट्रावर लादने हा महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय आहे’ असे मत यावेळी आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीने राजकारणाचा माहौल तापवला आहे. यावरून बराच राजकीय वाद झाल्याचेही दिसून आले. सहा जागांसाठी सध्या 7 उमेदवरा रिंगणार आहेत. त्यामुळे ही निवडणुक आणखी रंगतादार आहे.
काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा
काँग्रेसची जेवढी मतं आहेत त्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा आली आहे. काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याचा सस्पेन्स शेवटपर्यंत होता. शेवटी काँग्रेसने रविवारी रात्री उशीरा आपली यादी जाहीर केली. मात्र या यादीतलं नाव हे काँग्रेस नेत्यांसाठी मोठं सरप्राईज होतं. काँग्रेसने राज्यातून कुणालाच उमेदवारी न देता थेट इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता काँग्रेसची अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.
कोण आहेत इम्रान प्रतापगडी?
- इम्रान प्रतापागडी हे उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते आहे. ते उर्दु भाषेतील कवीही आहेत. त्यांची अनेक काव्य गाजलेली आहे.
- गेल्यावेळी उत्तर प्रदेशातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना हार पत्करावी लागली.
- इम्रान प्रतापगडी हे अल्पसंख्यांचा आवाज उचलणारे नेते आणि राहुल गांधीच्या जवळचे नेते मानले जातात.
कुठून कुणाला उमेदवारी?
नगमाही नाराज
ही नाराजी फक्त महाराष्ट्रातच नाही तर बाहेरही ही नाराजी दिसून आली आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमाही राज्यसभेच्या यादीवरून नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नेमंक चाललंय काय? असा सवाल सध्या राजकारणात विचारण्यात येत आहे. या यादीने स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्याला यावेळी संधी मिळायला हवी होती, असे मत वक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता ही नाराजी दूर करण्यासाठी सोनिया गांधी कोणती पाऊलं उचलणार, तसेच काँग्रेसला असेच धक्के बसत राहणार का? हेही पाहणं तितकेच महत्वाचं आहे.