काँग्रेसकडे उर्मिलासाठी वेळ, माझ्यासाठी नाही, प्रविण गायकवाडांची माघार
पुणे: संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. काँग्रेसला उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाला वेळ आहे, पण माझ्यासाठी नाही, अशी टीका प्रविण गायकवाड यांनी काँग्रेसवर केली. याशिवाय दुसरीकडे आयात उमेदवार चालतात, मग मी तर कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्यात आहे, अशी खंत प्रविण गायकवाडांनी व्यक्त केली. मात्र काँग्रेस उमेदवाराचं काम करणार […]
पुणे: संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. काँग्रेसला उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाला वेळ आहे, पण माझ्यासाठी नाही, अशी टीका प्रविण गायकवाड यांनी काँग्रेसवर केली.
याशिवाय दुसरीकडे आयात उमेदवार चालतात, मग मी तर कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्यात आहे, अशी खंत प्रविण गायकवाडांनी व्यक्त केली. मात्र काँग्रेस उमेदवाराचं काम करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रविण गायकवाड यांंचं नाव पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून चर्चेत होतं. पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांचे नाव स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सूचवलं होतं. मात्र, प्रविण गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकला नाही. काँग्रेसकडूनच इतर नावं पुण्याच्या जागेसाठी चर्चेत आल्याने प्रविण गायकवाड यांचं नाव मागे पडलं.
प्रविण गायकवाड यांच्या नावाला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला. बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी नको, अशी मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता.
एकीकडे पुण्यात भाजपने काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस उगवला, तरी काँग्रेसचा उमेदवारच जाहीर झालेला नाही. त्यामुळे गिरीश बापट यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता अद्याप कायम आहे.
अरविंद शिंदे यांचं नाव चर्चेत
दरम्यान, पुण्यात काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांचं नाव चर्चेत आहे. अरविंद शिंदे हे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक असून, काँग्रेसचे महापालिका गटनेते आहेत. पुण्यातील त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अरविंद शिंदे यांचे नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पुढे आले आहे. मात्र, त्यांच्याही नावावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. मात्र, अरविंद शिंदे हे काँग्रेसकडून प्रबळ दावेदार असल्याची माहिती आहे.
भाजपकडून उमेदवारीसाठी राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनीही जोर लावला होता. दरम्यान, काही काळ बंडाचे नाट्य झाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे नाट्य गुंडाळले. काँग्रेसबाबत परिस्थिती काहीशी वेगळी दिसत असून पुण्यातून कुणाला उमेदवारी द्यायची हाच पेच काँग्रेसला सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुण्यातील लोकसभा लढाई तुल्यबळ उमेदवारांमध्ये होणार की एकतर्फी हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
बापटांविरोधात पुण्यात काँग्रेसकडून ‘ही’ पाच नावं चर्चेत!
काँग्रेसकडून पुण्यातून प्रविण गायकवाड की अरविंद शिंदे? संध्याकाळपर्यंत ठरणार