Photo | वयाच्या 26 वर्षी राजकारणात प्रवेश, 8 वेळा खासदार ते ‘काँग्रेसचे चाणक्य’, अहमद पटेल यांचा थक्क करणारा प्रवास
काँग्रेसचं पहिल्या फळीतील मोठं नाव, ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास दु:खद निधन झालं. अहमद पटेल यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा फैजल यांनी दिली. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.
Follow us
काँग्रेसचं पहिल्या फळीतील मोठं नाव, ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास दु:खद निधन झालं. अहमद पटेल यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा फैजल यांनी दिली. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.
अहमद पटेल यांचा जन्म गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमध्ये झाला. 1977 मध्ये त्यांनी आपली पहिली लोकसभा निवडणूक लढली आणि जवळपास 62 हजार मतांनी ते विजयी झाले. 1980 मध्ये त्यांनी 82 हजार मतांनी विजय मिळवला. तर 1984 च्या निवडणुकीत त्यांचा तब्बल 1 लाख 23 हजार मतांनी विजय झाला. पुढे 1993 पासून अहमद पटेल राज्यसभेचे खासदार राहिले.
1977 ते 1982 दरम्यान पटेल यांनी गुजरात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर 1983 ते 1984 असं एक वर्ष त्यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं जॉईंट सेक्रेटरी पद सांभाळलं. पुढे 1985 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पटेल माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव राहिले. जानेवारी 1986 मध्ये त्यांच्यावर गुजरात काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
1991 मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर पटेल यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य बनवण्यात आलं. 1996 मध्ये त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं कोषाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. पण काही कारणांमुळे त्यांनी ते पद सोडलं.
पुढे 2000 साली सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून पटेल यांनी कारकिर्द गाजवली. संघटनेसोबतच पटेल यांनी नागरी उड्डाण मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे बनवण्यात आलेल्या कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळापासून अहमद पटेल राजकारणात होते. पटेल आतापर्यंत 8 वेळा खासदार राहिले आहेत. त्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत 5 तर लोकसभेत 3 वेळा त्यांनी काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं.
अहमद पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. 15 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शरिरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे आज पहाटे 3.30 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते.