विमान थांबवलं, प्रवाशांना दुसऱ्या विमानानं पाठवलं अन् काँग्रेस नेत्याला अटक, कुठे घडली घटना?
पवन खेरा यांच्या अशा प्रकारे अटकेवरून काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवला आहे. मोदी सरकारची ही हुकुमशाही असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्याच्या (Congress) अटकेसाठी आज मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. दिल्लीत विमानतळावर प्रवाशांनी भरलेली फ्लाइट रद्द करण्यात आली. दिल्ली ते रायपूर असं हे विमान उड्डाण घेणार होतं. मात्र विमानतळावर अचानक दिल्ली पोलीस आले. त्यांनी काँग्रेस नेते पवन खेरा (Pawan Khera) यांना विमानतळावरून अटक केली. पवन खेरा हे इतर काँग्रेस नेत्यांसोबत रायपूरला काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी रवाना होत होते. एवढ्यात विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी आसाम पोलिसांच्या शिफारशीवरून ही अटक केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
Today, our senior leaders were travelling from Delhi to Raipur on an Indigo flight. They had all boarded the flight when our leader @Pawankhera Ji was asked to disembark from it & later arrested.
This is UNDEMOCRATIC.
We vehemently OPPOSE this dictatorial behaviour. pic.twitter.com/UpStDowk9y
— Congress (@INCIndia) February 23, 2023
दुसऱ्या विमानाची सोय
या घटनेनंतर Indigo ने तत्काळ एक निवेदन जारी केलं. प्रवाशांना दिल्ली-रायपूर फ्लाइटमधून खाली उतरवण्यात आलं. विमान प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आम्ही आदेशाचं पालन करत आहोत, असे इंडिगोच्या वतीने सांगण्यात आले. तसेच प्रवशांची गैरसोय झाल्याबद्दल माफीही मागण्यात आली. सदर फ्लाइट रद्द केली गेली आणि प्रवाशांना दुसऱ्या फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली.
सामान चेक करायचंय म्हणाले…
I was told they wanted to see my luggage. I said I don’t have anything except a handbag. When I came down from the aircraft, I was told I can’t go and DCP will come. I don’t know why I am being stopped: Congress leader Pawan Khera pic.twitter.com/CcftKCnCtw
— ANI (@ANI) February 23, 2023
विमानतळावर नेमकं काय घडलं, यासंबंधीची माहिती पवन खेरा यांनी वृत्तसंस्थेला दिली. मी विमानात बसलो तेव्हा मला सामान चेक करायचंय, असं सांगण्यात आलं. माझ्याकडे हँडबॅग वगळता काहीही नाही, असं म्हटल्यावर डीसीपींना तुम्हाला भेटायचंय, त्यामुळे विमानाच्या खाली उतरा, असं सांगण्यात आलं. मला रायपूरला जाण्यापासून का रोखण्यात आलं, हेच समजत नाही, असं वक्तव्य पवन खेरा यांनी केलंय.
अटक का झाली?
आसाम पोलीसांच्या शिफारशीनंतर ही कारवाई करण्यात आली. ANI वृत्तसंस्थेला आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आसामच्या हाफलाँग येथे काँग्रेस नेते पवन खेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आसाम पोलिसांच्या रिमांडवरूनच ही अटक करण्यात आली. स्थानिक कोर्टाच्या परवानगीनंतर पवन खेरा यांना आसाममध्ये नेलं जाईल.
काँग्रेसचं धरणे आंदोलन
दरम्यान, पवन खेरा यांच्या अशा प्रकारे अटकेवरून काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवला आहे. मोदी सरकारची ही हुकुमशाही असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. रायपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बाधा आणण्यासाठी असा प्रकार केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.