Goa Political Crisis : महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही मोठा राजकीय भूकंप; विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेस आमदार भाजपात प्रवेश करणार!
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यावर ठाम असल्याचं कळतंय. तर काही आमदार द्विधा मन:स्थितीत आहेत. तर काँग्रेसकडून आमदारांची मनधरणी केली जात असल्याची माहिती मिळतेय.
पणजी : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता शेजारी गोव्यातही (Goa Politics) मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळतोय. गोव्यातील काँग्रेस आमदार (Congress MLA) भाजपच्या वाटेवर आहेत. भाजपमध्ये प्रवेशासाठी हे आमदार आज रात्री दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गोव्यात तयारी पाहायला मिळतेय. मात्र, काँग्रेसचे किती आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo) यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यावर ठाम असल्याचं कळतंय. तर काही आमदार द्विधा मन:स्थितीत आहेत. तर काँग्रेसकडून आमदारांची मनधरणी केली जात असल्याची माहिती मिळतेय.
काँग्रेस आमदारांना पक्षात घेण्यास भाजपचाही हिरवा कंदिल
इतकच नाही तर विरोधी पक्षनेते मायकल लोबो, काँग्रेस आमदार केदार नाईक आणि राजेश फळदेसाई हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायरल लोबो यांच्यासह आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपच्या हायकमांडनेही या आमदारांना पक्षात घेण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी हे आठही आमदार एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गोवा विधानसभेची सदस्यसंख्या 40 आहे. काँग्रेसकडे 11, भाजपकडे 20, एमजीपीकडे दोन आणि तीन अपक्ष आमदार आहेत. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज संध्याकाळी तातडीने गोव्याला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
गोव्यातही महाराष्ट्राचा फॉर्म्युला ?
>> गोव्यातील काँग्रेसचे आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वतःचा एक गट तयार करण्याच्या तयारीत
>> काँग्रेस आमदारांचा हा गट गोव्यातील डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता
>> गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे
>> त्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय
>> कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव पुढील कार्यवाहीसाठी आज दुपारी गोव्यात दाखल झाले आहेत.
प्रवेश करणारे संभाव्य आमदार
- मायकल लोबो
- राजेश फळदेसाई
- दिलायला लोबो
- केदार नाईक
- दिगंबर कामत
- एलेक्स सिक्वेरा
- संकल्प आमोणकर
तळ्यातमळ्यात
- एल्टन डिकोस्टा
- रुडाल्फ फर्नांडिस