हैदराबादहून शेरवानी घालून येणाऱ्यांनी येथे गडबड करणे आम्हाला मान्य नाही : हुसेन दलवाई
काँग्रेसचे नेते आणि खासदार हुसेन दलवाई यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे (Husain Dalwai on Asaduddin Owaisi).
सोलापूर : काँग्रेसचे नेते आणि खासदार हुसेन दलवाई यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे (Husain Dalwai on Asaduddin Owaisi). हैदराबादहून शेरवानी घालून येणारेच महाराष्ट्रात गडबड करतात. हे आम्हाला मान्य नाही, असं मत हुसेन दलवाई यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी हिंदुत्व, शिवसेना, सावरकर, कुटुंब नियोजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावरही भाष्य केलं (Husain Dalwai on Asaduddin Owaisi).
हुसेन दलवाई म्हणाले, “महाराष्ट्रातील मुस्लिमांना सत्तेत सामावून घेणं आवश्यक आहे. जे घडतंय ते चुकीचं आहे. महाराष्ट्रातील मुसलमान हा खऱ्या अर्थानं या मातीतील मुसलमान आहे. येथे असणारा मुस्लीम हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्याची भाषा कधीही करत नाही. कुणीतरी हैदराबादवरून शेरवानी घालून येतो आणि येथे गडबड करतो. हे आम्हाला मान्य नाही. हे कुठे तरी थांबवणं आवश्यक आहे.”
शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यामध्ये फरक आहे. शिवसेनेने वेळोवेळी काँग्रेसला मदत केली आहे. आणीबाणीला देखील बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता, असं म्हणत दलवाई यांनी शिवसेनेसोबतच्या युतीचं समर्थन केलं.
“मोहन भागवताना किती मुलं आहेत माहिती नाही, त्यांनी नसत्या उठाठेवी करु नये”
कुटुंब नियोजनाच्या विषयावर बोलताना हुसेन दलवाई म्हणाले, “मोहन भागवत यांना किती मुलं आहेत मला माहिती नाही. देशाने ‘फॅमिली प्लॅनिंग’ स्वीकारलं आहे. अपत्यांची संख्या तीनवरुन दोनवर आणल्यास फरक पडणार नाही. भागवतांनी नुसत्या उठाठेवी करू नये.”
“राऊत बोलण्याला लगाम घालतील असं मी समजतो”
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसला लक्ष्य केल्याच्या मुद्द्यावर दलवाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “सावरकरांचा देशासाठी मोठा त्याग आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. संजय राऊत अंदमानला जाऊन आले की नाही मला माहिती नाही. पण काही जण म्हणतात त्यांनी माफीचं पत्र लिहिलं होतं. मला यात वाद निर्माण करायचा नाही. मात्र, राऊत आपल्या बोलण्याला लगाम घालतील, असं मी समजतो.”