काँग्रेससोबत आघाडीसाठी तयार, पण राष्ट्रवादी नको : वंचितची अट
काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तर वंचित आघाडी या आघाडीत सहभागी होणार नाही. केवळ काँग्रेससोबतच आघाडी करण्याची तयारी प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) आहे.
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सोबत घेण्याचा अटोकाट प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. वंचित आघाडी आमच्यासोबत येण्यास तयार आहे असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर, आता वंचितनेही काँग्रेससोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र वंचितने काँग्रेससमोर अशक्यप्राय अट ठेवली आहे. ती अट म्हणजे काँग्रेससोबत जर राष्ट्रवादी नसेल तरच आघाडी करण्याची आहे.
म्हणजेच जर काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तर वंचित आघाडी या आघाडीत सहभागी होणार नाही. केवळ काँग्रेससोबतच आघाडी करण्याची तयारी प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) आहे.
वंचितच्या या अटीमुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा पक्ष समावेश होण्याची चिन्हं कठीण दिसत आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी भूमिका जाहीर केली होती. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं होतं. आताही त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध कायम आहे.
त्यामुळेच वंचितने जर राष्ट्रवादी सोबत नसेल तरच काँग्रेसशी आघाडी करण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेससोबत आघाडी झाल्यास 50 टक्के जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची भूमिकाही वंचितने घेतली आहे.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
दरम्यान, नुकतंच बाळासाहेब थोरात यांनी वंचित आघाडी आमच्यासोबत येण्यासाठी तयार असल्याचा दावा टीव्ही 9 मराठीकडे केला होता. वंचित आघाडीने तसं पत्र काँग्रेसला दिलं. या पत्रात जागांची मागणी नाही, मात्र वंचित काँग्रेस सोबत असेल असा उल्लेख आहे.
वंचितची पहिली यादी
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीला 30 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. आघाडीचा निर्णय न झाल्यास नाईलाजाने 30 जुलैला वंचित आपली विधानसभेच्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
संबंधित बातम्या
वंचितचा काँग्रेस-राष्ट्रवादीला अल्टीमेटम, 30 जुलैला पहिली यादी जाहीर करणार
प्रकाश आंबेडकरांची भेट, माजी राष्ट्रपतींचा सुपुत्र वंचित आघाडीत?
काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार, वंचितच्या 288 जागांसाठी मुलाखती सुरु
काँग्रेसला आम्ही 40 जागा द्यायला तयार, वंचित बहुजन आघाडीचा अल्टीमेटम