Congress : महागाईकडे लक्ष द्या अन्यथा परिस्थिती स्फोटक बनेल, काँग्रेसचा इशारा
तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेची जी स्थिती होती तीच आज भारताची असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलली नाहीत तर देशातील परिस्थिती स्फोटक बनण्यास वेळ लागणार नाही, असा गर्भीत इशारा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
मुंबई : श्रीलंकेत सध्या महागाईचा (Inflation) डोंब उसळला आहे. यामुळे श्रीलंकेत (Srilanka) सध्या मोठ्या प्रमाणात हिंसाही होत आहे. ही हिंसा सध्या जगाचं लक्ष वेधून घेत आहे. त्यावरूनच काँग्रेसने (Congress) आता केंद्रातील भाजप सरकारला इशारा दिला आहे. याबाबत काँग्रेस प्रववक्ते अतुल लोंढे म्हणाले, केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता धार्मिक प्रश्न पुढे आणत आहे हे देशाच्या हिताचे नाही. महागाईचा आगडोंब उसळला असताना सरकार मात्र आकड्यांचा खेळ करून आभासी व दिशाभूल करणारे चित्र दाखवत आहे. तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेची जी स्थिती होती तीच आज भारताची असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलली नाहीत तर देशातील परिस्थिती स्फोटक बनण्यास वेळ लागणार नाही, असा गर्भीत इशारा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
गॅस, पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, मागील चार-पाच वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत. नागपूरसारख्या शहरात 410 रुपयांचा गॅस सिलिंडर 1100 रुपयांना झाला आहे, खाद्यतेल 70 रुपयांवरून 200 रुपये झाले, भाजीपाला महाग झाला आहे, सीएनजी 36 रुपयांवरून 90 रुपये झाला. पेट्रोल-डिझेलने 100 रुपयांचा टप्पा कधीच पार केला आहे. ही महागाई सातत्याने वाढतच आहे आणि सामान्य माणूस या महागाईच्या ओझ्याखाली दबला जात आहे. परंतु सरकार मात्र महागाईच्या आकडेवारीमध्ये जगलरी करुन यातून काही वाचता येईल का याचा प्रयत्न करत आहे. अन्नधान्याचे काही आकडे कमी करून महागाई दर कमी आला असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार आकड्यांचा खेळ करून आभासी चित्र दाखवू शकते पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.
अन्यथा महागात पडेल…
भारतावरचे कर्ज आज सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 92 टक्क्यांपर्यंत गेले आहे. 267 बिलियन डॉलरचे कर्ज पुढच्या महिन्यात परत करावे लागणार आहे, ही वस्तुस्थिती सरकार जनतेपुढे येऊ देत आहे. सरकारने वस्तुस्थिती कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना कळत नाही असे नाही. हिंदू-मुसलमान सारखे धार्मिक विषय पुढे करून जीवनावश्यक विषय दाबून ठेवले तर आपल्याला ते महाग पडेल यात दुमत असण्याचे कारण नाही. केंद्रातील सरकारच्या चुकीचा धोरणांचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे त्यांनी वेळीच लक्ष द्यावे अन्यथा गंभीर परिणाम दिसतील, असे लोंढे म्हणाले.