Congress MLA | विधान परिषद निवडणुकीतील उमेदवाराच्या पराभवाचं चिंतन, विदर्भातील काँग्रेस आमदार मुंबईला रवाना
काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव का झाला. कोणती मतं फुटली असण्याची शक्यता आहे, या सर्व बाबींवर विचारविनिमय होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव का झाला, याचं चिंतन केलं जाईल. यासाठी सर्व काँग्रेसच्या आमदारांना मुंबईला बोलावण्यात आले आहे.
नागपूर : राजकीय घडामोडींना वेग आलाय. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. महाविकास आघाडीची काही मतं फुटली. त्यानंतर एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सूरतला गेले. तिथं ते काय निर्णय घेतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. इकडं, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार हरला. त्यानंतर काँग्रेसने सगळ्या आमदारांना तातडीने मुंबईला बैठकीसाठी बोलावले. यासाठी नागपुरातील आणि विदर्भातील सगळे काँग्रेस आमदार मुंबईसाठी नागपूर विमानतळावरून रवाना झाले. काँग्रेस झालेल्या पराभवाचं चिंतन करणार असल्याचंसुद्धा सांगितलं जात आहे. मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यासह काँग्रेस आमदार विकास ठाकरे (Vikas Thackeray), राजू पारवे (Raju Parve), प्रतिभा धानोरकर हे नागपूरहून रवाना झाले. यावेळी काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला खरचं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं सांगितलं.
केदार म्हणाले, आम्हाला आत्मचिंतनाची गरज
सुनील केदार म्हणाले, राजकारणात बऱ्याच गोष्टी अनपेक्षित घडतात. मी बाळा साहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. आमची मुंबईत बैठक आहे. मी सुद्धा जात आहे. बऱ्याच लोकांनी हे सरकार स्थापन होऊ नये म्हणून प्रयत्न केला. मात्र या सरकारने कोरोनाच्या काळात सुद्धा चांगलं काम केलं. न्यायपालिकेने सुद्धा या कामाची स्तुती केली होती. पण काही लोकांना हे सरकार अस्थिर करून पाडायचं आहे. सत्ता हस्तगत करायची आहे. आमच्या उमेदवाराचा पराभव झाला, हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे. आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. याच्याबद्दल लवकरच बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्याकडे बैठक होईल. यावर चर्चा होऊन मार्ग निघेल. या सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर तळागाळातल्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही काम केलं. आघाडीमध्ये काही मर्यादा असतात. आघाडी धर्म पाळायचा असतो. या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स करत स्वर्ण बिंदू साधायचा असतो. आम्ही त्या पद्धतीने केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आम्हाला यात फायदा झाला.
एकनाथ शिंदे लोकहिताचा निर्णय घेतील
सुनील केदार म्हणाले, एकनाथ शिंदे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. मी त्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून पाहिलं. राज्याचे मंत्री म्हणून पाहिलं आहे. त्यांची काम करण्याची शैली आणि जोपासले लोक त्याच्यामुळे त्यांच्यावर माझा नक्कीच विश्वास आहे. त्यांची नाराजी आहे की नाही, हे मला सांगता येणार नाही. ते एक घडलेल्या व्यक्तिमत्व असल्याने ते लोक हिताच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेतील. राग असला तरी लोकहित पाहतील. नागपुरातील काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलं की, आम्हा सगळ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर चर्चा होणार आहे.