कलह वाढला, भाजप आमदारांना तिकीट नको; शिंदे गटाला हव्यात विधानसभेच्या जागा
विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. अद्याप जागावाटपाची बोलणीही सुरु झालेली नाही. अशातच शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजप आमदार नको अशी भूमिका घेतल्याने नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपाचा अंतगर्त कलह चव्हाट्यावर आला आहे.
नवी मुंबईमधील दोन विधानसभा मतदारसंघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांनी आपला दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. अद्याप जागावाटपाची बोलणीही सुरु झालेली नाही. अशातच शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजप आमदार नको अशी भूमिका घेतल्याने नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपाचा अंतगर्त कलह चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबई येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण विधानसभा रहिवाशांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातूनच ही मागणी पुढे आली आहे.
नवी मुंबईमध्ये बेलापूर आणि ऐरोली असे विधानसभा मतदारसंघ आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी दावा केला आहे. बेलापूरमधून मला उमेदवारी मिळावी अशी माझी मागणी आहे. शेवटी पक्षाचे नेते आमचा निर्णय घेतील. यापूर्वीही मी निवडणुकीच्या रिंगणात होतो असे त्यांनी म्हटले आहे.
नवी मुंबईतील ऐरोली या विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे गणेश नाईक आमदार आहेत. या जागेवरही शिंदे गटाचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आपला दावा सांगितला आहे. पाटण विधानसभेअंतर्गत आज मेळावा होता. याचा आम्हाला आनंद वाटला. आम्ही नक्कीच खूप चांगले काम करत आहे. ऐरोलीमधून मला उमेदवारी मिळावी, अशी मागणी विजय चौगुले यांनी केली आहे.
शिंदे गटाचे नेते विजय चौगुले आणि विजय नाहटा यांच्या या दाव्यामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांचे तिकीट कापले जाणार का याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात खेळीमेळीने जागावाटप होईल. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल. त्यात नवी मुंबईही मिळेल असे विधान करून रंगत आणली आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. आमदार फोडण्यासाठी 25 कोटी आणि दोन एकर जागा दिली असा आरोप राऊत यांनी केला. त्यावर संजय राऊत यांनी तसे सबुत द्यावे. नुसत्या हवेत गोळ्या मारू नये. संजय राऊत दाखवायला लागले तर लोक टीव्हीचे बटन दाबतात असा टोलाही मंत्री देसाई यांनी लगावला.