लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?, ठाकरे सरकारला भाजपचा सवाल
सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का? अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय.
मुंबई : कोरोना लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं जागतिक निविदा काढल्या. त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकावर जोरदार टीका केलीय. महाविकास आघाडी सरकारच्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का? अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय. (Keshav Upadhyay criticizes Thackeray Government over global tender of corona vaccine)
अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लशीची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का? असा प्रश्नही त्यांनी केलाय. लस खरेदी प्रक्रिया नेमकी कशामुळे रखडली अडकली याचा राज्य तातडीने खुलासा करून सरकारने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी मागणीही त्यांनी केलीय.
निविदा प्रक्रियेबाबत सरकारने खुलासा करावा
“कोरोना प्रतिबंधक लसीसाठी जागतिक निविदा काढण्याची घोषणा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्याबाबतच्या वाटाघाटींचे अधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर वृत्तपत्रामधून निविदा जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र महिना उलटूनही या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. अगोदरच, महाराष्ट्र सरकारच्या विश्वासार्हतेवर वाझेसारख्या वसुली प्रकरणांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावरून या निविदांना प्रतिसाद न मिळण्यात असेच काही कारण नसावे ना, अशी शंका वाटू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने खुलासा करून पारदर्शकतेची हमी दिली पाहिजे” असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय.
5 लाखांपर्यंतच्या उपचाराचा खर्च करा
म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचार प्रचंड खर्चिक असल्याने गोरगरिबांना, सर्वसामान्यांना ते परवडणारे नाहीत. राज्य सरकारने या आजारावरील 5 लाखांपर्यंतच्या उपचाराचा खर्च करावा, या आजारावरील उपचाराचे शुल्क निश्चित करावे, या शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या रुग्णालयांवर, डॉक्टरांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी केलीय.
‘काँग्रेसची भूमिका दुटप्पी’
त्याचबरोबर पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केलाय. आमच्यामुळे याबाबतच्या निर्णयाला स्थगिती मिळाली असल्याचा दावा काँग्रेस नेते करीत असले तरी या संदर्भातील समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली भूमिका काँग्रेस नेत्यांनी का मान्य केली? यावरून काँग्रेस नेत्यांचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आल्याची टीकाही उपाध्ये यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी; काँग्रेस आणणार शिवसेनेला अडचणीतhttps://t.co/pUV0VUwS0Y#bmc | #nullahcleaning | #mumbai | #congress | #shivsena | #raviraja | @ravirajaINC
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2021
संबंधित बातम्या :
कोविड सेंटरमधील ‘झिंगाट’ डान्सवरुन रोहित पवार आणि दरेकरांमध्ये ट्विटर वॉर!
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता 10वी, 12वी परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करा, भाजपची मागणी
Keshav Upadhyay criticizes Thackeray Government over global tender of corona vaccine