मुख्यमंत्र्यांच्या वापर शिवसेनेविरोधात ‘कॉण्ट्रक्ट किलर’प्रमाणे, पण तरीही शिवसेना…; ‘सामना’मधून पुन्हा शिंदे गटावर निशाणा
'सामना'मधून पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. सामनाच्या रोखठोक या सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करण्यात आला आहे.
मुंबई : ‘सामना’मधून पुन्हा एकदा शिंदे (Shinde) गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. सामनाच्या रोखठोक या सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघात करण्यात आला आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड कष्टातून निर्माण केलेली शिवसेना (Shiv sena) दिल्लीतील राज्यकर्त्यांनी कपट- कारस्थानाचे घाव घालून कागदोपत्री संपवली. त्याकामी महाराष्ट्रातील एक शिंदे व त्यांच्या चाळीस गारद्यांची मदत घेतली. शिवसेना हे ज्वलंत नाव गोठवले गेले. बाळासाहेब ज्याची रोज पूजा करीत ते धनुष्यबाण चिन्हदेखील गोठविण्यात आले’.
‘महाराष्ट्राची कवचकुंडले दिल्लीच्या चरणी’
“महाराष्ट्राची कवचकुंडलेच शिंदे व त्यांच्या गारद्यांनी दिल्लीच्या चरणी अर्पण केली. शिवसेना म्हणजे मराठी माणसांच्या रक्षाणासाठी उपसलेली भवानी तलवारच आहे. मात्र राजकारण या भवानी तलवारीपर्यंत भिडले, त्या भवानी तलवारीचे असे अध:पतन ‘आम्ही शिवरायांचे मावळे’ म्हणणाऱ्यांनीच केले”.असा जोरदार प्रहार सामनामधून करण्यात आला आहे”.
‘शिंदे यांनी कुठेतरी ब्रेक लावायला हवा’
पुढे रोखठोकमध्ये म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचा वापर शिवसेनेविरोधात ‘कॉण्ट्रक्ट किलर’प्रमाणे होत आहे. शिंदे नामाचा महाराष्ट्रातील इतिहास शौर्याचा व इमानाचा आहे. पण सध्याचे शिंदे हे महाराष्ट्राचे खलपुरुष ठरत आहेत. हे त्यांच्या लक्षात येत नाही. मुख्यमंत्रीपद म्हणजे प्रतिष्ठा नाही, महाराष्ट्रात रोज अनेक नातवंडे, पतवंडे जन्माला येतात. त्यांचे आशीर्वाद खऱ्या शिवसेनेलाच असतील. शिंदे यांनी कुठेतरी स्वत:ला ब्रेक लावायला हवा’ अशी टीका रोखठोकमध्ये करण्यात आली आहे. आता या टीकेला शिंदे गट नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.