तारीख पे तारीख! मुख्यमंत्री म्हणाले, चार दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल, आता मुनगंटीवारांनी सांगितली नवी तारीख
राज्यात घटनात्मक पेच निर्माण झालाय. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या दोन गटातील खटल्याची सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
चंद्रपूर : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार, यावर चर्चा सुरू आहेत. पण, अद्याप या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघालेला दिसत नाही. या मुहूर्तासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितलं. पण, आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet expansion) तारीख पुन्हा वाढल्याची माहिती आहे. यासंदर्भातील माहिती माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी ध्वजारोहण असल्याने 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली
राज्यात घटनात्मक पेच निर्माण झालाय. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या दोन गटातील खटल्याची सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांवर अविश्वासाची टांगती तलवार आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाचा विचार पुढे नेणा-यालाच कार्यकर्त्यांचे समर्थन नसेल. असे सांगत ओठात- पोटात व कणाकणात हिंदुत्व असलेल्या नेत्याला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
तर्काच्या आधारावर निर्णय घ्यावा
सर्वोच्च न्यायालयाने तर्काच्या आधारे निर्णय घ्यावा. हवा तेवढा वेळ घेऊन एकदाची याबाबत स्पष्टता करावी, असेही मुनगंटीवार म्हणाले. काही पक्ष म्हणजे कुटुंबविस्तार असल्याचे सांगत या कौटुंबिक पक्षांना कार्यकर्ते कंटाळले असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या जी-23 असंतुष्ट गटाबाबतही त्यांनी अशीच भूमिका मांडली. काँग्रेसमध्ये सोनिया, राहुल यांची घराणेशाही चालत आली आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची घराणेशाही चालत आली आहे. एकंदरित काँग्रेस आणि शिवसेनेवर त्यांचा रोख आहे.
विरोधकांची टीका
विरोधक मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करत असतात. पालकमंत्री असल्यास राज्याच्या विकासकामांना गती येते. परंतु, राज्यात दोन जणांचे मंत्रिमंडळ असल्यानं जिल्ह्याच्या ठिकाणचा विकास खुंटला असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला होता. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जातं. परंतु, अद्याप या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला नाही. तारीख पे तारीख देणे सुरू आहे.