‘पक्षप्रमुखांचा आम्हाला अभिमान, त्यांच्या हातून चांगलं काम घडो’, दीपक केसरकरांकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा
शिंदे गटातील आमदार आणि त्यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना पक्षप्रमुखांचा आम्हाला अभिमान आहे. तेव्हाही होता आणि आजही आहे, असं केसरकर म्हणाले.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांना राजकीय नेतेमंडळींसह विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात. मात्र, त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी शिंदे गटातील आमदार आणि त्यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना पक्षप्रमुखांचा आम्हाला अभिमान आहे. तेव्हाही होता आणि आजही आहे, असं केसरकर म्हणाले.
आज चांगला दिवस आहे. आदरणीय उद्धवसाहेबांचा आज वाढदिवस आहे. मी एकनाथ शिंदे आणि आमच्या आमदारांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून चांगलं काम होवो ही शुभेच्छा. आमचा विषय हा वैचारिक मुद्द्यांचा आहे. कालची मुलाखत पाहिली. असे प्रश्न विचारले जाता कामा नये, असं मला वाटतं. ज्या प्रश्नातून चुकीची रिअॅक्शन किंवा चुकीचा मेसेज लोकांमध्ये जाता कामा नये असं मला वाटतं. मी काही मुद्द्यांच्या आधारे उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेईन. आज वाढदिवस आहे, चांगला दिवस आहे.
‘पक्षप्रमुखांचा आम्हाला अभिमान, तेव्हाही होता, आजही आहे’
आदित्य ठाकरे यांच्याबाबत मात्र बोलू इच्छितो, तुम्ही प्रिव्हिलेज्ड व्यक्ती आहात. पण तुम्ही दुसऱ्यांवर अशा शब्दात टीका करु शकत नाही. आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहोत. ज्या झाडाखाली तुम्ही मोठे झालात, ज्या झाडांची सावली तुम्ही उपभोगली, हे सगळं होण्यासाठी ज्या लोकांनी साथ दिली त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नाही. पक्षप्रमुखांचा आम्हाला अभिमान आहे, तेव्हाही होता आजही आहे, असं केसरकर यांनी म्हटलंय. तसंच शिंदे यांनी कोविड काळात चांगलं काम केलं. त्यांना दोन वेळा कोरोना झाला. ते ग्राऊंडवर राहून कामकाज पाहत होते. आमचं सरकार हे लोकांसाठी समर्पित सरकार आहे, असा दावाही केसरकर यांनी केलाय.
शिंदे, फडणवीसांनी पक्षप्रमुख उल्लेख टाळला!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देताना शिंदे आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला आहे. त्याऐवजी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून अमान्य आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.