Maharashtra politics : ठाणे असो या मुंबई शिवसैनिकांनो भगवा डौलाने फडकवा; दिपाली सय्यद यांचं भावनिक पत्र
शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले आहे. आज शिवसेना संकटातून मार्ग काढत आहे. सर्व शिवसैनिकांनी आपल्या विभागासाठी, प्रभागासाठी, गावांसाठी, महाराष्ट्रासाठी शिवसेनेला बळकट करावे असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत फूट पडली आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बहुमत चाचणीच्या अगोदरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात नव्या सरकारची स्थापना देखील झाली आहे. मात्र एकाचवेळेस एवढ्या मोठ्या संख्येने आमदार फुटल्याच्या धक्क्यातून अद्यापही शिवसैनिक बाहेर पडू शकलेले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले आहे. आज शिवसेना संकटातून मार्ग काढत आहे. सर्व शिवसैनिकांनी इतर गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या विभागासाठी, प्रभागासाठी, गावांसाठी, महाराष्ट्रासाठी शिवसेनेला बळकट करा, असं दिपाली सय्यद यांनी म्हटले आहे. त्यांनी शिवसैनिकांना आवाहन करणारे एक पत्रच पोस्ट केले आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं?
‘आदरणीय शिवसैनिक, जेव्हा जेव्हा आपला महाराष्ट्र संकटात पडला शिवसेनेचा शिवसैनिक त्या संकटाला नडला. आज शिवसेना संकटातून संघर्ष करत आहे, पक्षश्रेष्ठी व शिवसेनेचे नेते यांच्यात कायदेशीर लढा सुरू आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या सर्व संकटातून शिवसेना मार्ग काढेल, परंतु शिवसैनिकांनी त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपली शिवसेना आपल्या विभागासाठी प्रभागासाठी, गावांसाठी, महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळकट करा. पुणे असो वा ठाणे, मुंबई असो या नवीमुंबई संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहिला पाहिजे. वरीष्ठ पातळीवरच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून शिवसैनिकांनी आपल्या शाखा आणि विभागात जनतेच्या सेवेसाठी उतरावे, जय महाराष्ट्र! असे दिपाली सय्यद यांनी आपल्या या पत्रात म्हटले आहे.
शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र
शिवसेनेमधील जवळपास 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने सावध पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता आपण ठाकरेंशी एकनिष्ठ आहोत असे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांना सादर करावे लागणार आहे. शिवसैनिक, नगरसेवक, शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांना असे पत्र सादर करावे लागणार आहे. शिवसेनेच्या या निर्णयावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार टीका केली आहे. मी हिंदुत्व सोडणार नाही असे उद्धव ठाकरे लिहून देणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.