दिल्ली हायकोर्टातून महत्त्वाची अपडेट! ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सुनावणी कधी?
धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्ट स्थगिती देणार? कधी होणार निर्णय?
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाला स्थगिती मिळावी, यासाठी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) याचिका दाखल केली होती. सोमवारी दाखळ केलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ठाकरे (Thackeray) गटातून काल दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली गेली होती. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता होती. मात्र अखेर ही सुनावणी आज होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हायकोर्टाच्या आजच्या कामकाजात ठाकरे गटाने केलेल्या याचिकेचा समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे.
आता कधी सुनावणी?
सोमवारीच आपल्या याचिकेवर सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने दिल्ली हायकोर्टात करण्यात आली होती. तशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली होती. मात्र ही सुनावणी सोमवारऐवजी आज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. दरम्यान, ठाकरे गटाची याचिका आजही सुनावणीसाठी दिल्ली हायकोर्टात येणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देणाऱ्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आता नेमकी केव्हा सुनावणी होते, याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. तसंच या सुनावणीनंतर दिल्ली हायकोर्ट खरंच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देतं की ठाकरे गटाला फटकारतं, याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
आमचंही ऐकून घ्या- शिंदे
एकीकडे ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात दाद मागितलीय. तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही दिल्ली हायकोर्टात कॅव्हेट सादर करण्यात आलं आहे. आमची बाजू ऐकल्याशिवाय ठाकरे गटाच्या याचिकेवर निर्णय घेऊ नये, अशी मागणी शिंदे गटाने केलीय. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने सोमवारी ठाकरे आणि शिंदे गटाची तात्पुरती नावं काय असतील, हे स्पष्ट केलं. यानंतर वरुनही राज्याचं राजकारण तापलंय.