उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जनता दरबार
अजित पवार खास आपल्या स्टाईलने अधिकाऱ्यांना फोन करुन लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अन्य मंत्र्यांचे जनता दरबार साधारण 2 तास चालत असले, तरी अजितदादांचा जनता दरबार मात्र 4 तास चालतो.
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जनता दरबार होणार आहे. सर्व मंत्र्यांमध्ये अजित पवार यांचा जनता दरबार सर्वाधिक लोकप्रिय आहे. राज्यातील नागरिक मोठ्या संख्येनं अजित पवार यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात. अजित पवार नागरिकांच्या या समस्या ऐकून त्यांची कामं तातडीने मार्गी लावण्यावर अजित पवारांचा भर असतो. त्यामुळे अजितदादांकडे येणाऱ्या लोकांची संख्याही मोठी असते. (Ajit Pawar janta darbar)
अजित पवार यांची बोलण्याची जशी एक स्टाईल आहे. तशी ती कामाच्या पद्धतीमध्येही पाहायला मिळते. लोकांनी मांडलेले प्रश्न समजून घेत, त्यांच्या स्टाईलने ते अधिकाऱ्यांना फोन करुन लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अन्य मंत्र्यांचे जनता दरबार साधारण 2 तास चालत असले, तरी अजितदादांचा जनता दरबार मात्र 4 तास चालतो. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य मंत्रीही जनता दरबार घेतात. त्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे अशा अनेक मंत्र्यांचा समावेश आहे.
शिवसेनेसोबत जुळवून घ्या- अजितदादा
आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे, त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बुधवारी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची खलबतं झाल्याची माहिती आहे.
“आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या” अशा स्पष्ट सूचना अजित पवारांनी आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या. लवकरच महामंडळ वाटप करणार असल्याची माहितीही अजितदादांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी यापुढील सर्व निवडणुका एकत्रितरित्या लढण्याचे संकेत आधीच दिले होते.
पराभूत उमेदवारांसोबत चर्चा
पराभूत उमदेवारांना मिळालेली मतं, त्यांचं मतदारसंघातील प्राबल्य, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती, या उमेदवारांच्या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये या उमेदवारांची भूमिका काय असेल? याचीही चर्चा या बैठकीत होऊन त्या अनुषंगाने जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या:
पराभूतांवर नवी जबाबदारी?, विधानसभा, लोकसभेतील पराभूत उमेदवारांबरोबर राष्ट्रवादीची बैठक
राज्यपाल नियुक्त सदस्य नेमणुकीची कायद्यात अस्पष्टता, केंद्राला नोटीस; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
Ajit Pawar janta darbar