मतदारसंघात कुस्ती आणि मुंबईत दोस्ती, रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस चक्क आजूबाजूला बसले?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अनपेक्षित राजकीय घटना घडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जीवंत आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. पण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची आठवून करुन देणारा आज नवा प्रसंग समोर आलाय.
मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ ताकदवार आहेत. दोन्ही संघात मातब्बर खेळाडू आहेत. त्यामुळे या दोन ताकदवान संघाचा सामना प्रत्यक्षात स्टेडियममध्ये पाहण्याची संधी मुंबईतील क्रिकेट चाहते सोडणं शक्यच नाही. विशेष म्हणजे या क्रिकेट सामन्याची भुरळ महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात मैदान मारणाऱ्या दिग्गज नेत्यांनादेखील पडली. त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: सामना पाहण्यासाठी गेले. तसेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यानीदेखील हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एक अनोखी गोष्ट बघायला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात एकमेकांवर चालून जाणारे राजकारणी आज थेट एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले.
रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय विश्वासाचे आणि निकटवर्तीय असेलेले भाजप नेते राम शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात निवडून येऊन राम शिंदे मंत्री होते. असं असताना 2019च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांना धूळ चारत विजय मिळवला होता. या निकालानंतर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये वारंवार राजकीय मतभेद बघायला मिळतात. राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात सातत्याने कलगीतुरा रंगतो. असं असताना आज रोहित पवार आणि फडणवीस आजूबाजूला बसलेले बघायला मिळाले.
रोहित पवार यांना मतदारसंघात मोठा धक्का
विशेष म्हणजे रोहित पवार यांचे राम शिंदे यांच्यासोबतचे मतभेद दाखवणारी आजची बातमी ताजी आहे. राम शिंदे यांच्या आरोपांनंतर आज बारामती अॅग्रोवर गुन्हा दाखल झाला आहे. तारखेपूर्वी गाळप केल्याने बारामती अॅग्रो साखर कारखान्यावर गुन्हा दाखल झालाय. बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवेंवर गुन्हा दाखल झालाय. सुभाष गुळवे यांच्या विरोधातील ही कारवाई म्हणजे आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. या प्रकरणी राम शिंदे यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांनंतर आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यायला भाग पाडतो तो खेळ असतो आणि महाराष्ट्रात नेहमीच असं खिलाडू वातावरण बघायला मिळतं… मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंडिया-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आणि @MumbaiCricAssoc चे अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबतचा असाच एक क्षण…… https://t.co/D4bJ4EKM4W pic.twitter.com/vBC7Zb5SrT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 17, 2023
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय शत्रूत्व सर्वश्रूत असंच आहे. देवेंद्र फडणवीस विधानसभेत हजर राहिले नाही म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच आक्रमक झाल्याची बातमी ताजी आहे. असं असताना राजकारणापलीकडे देखील एक महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही पिढ्यांपिढ्या चालून येत आहे. सध्याच्या काळात ज्याप्रकारे राजकारण सुरु आहे ते पाहता ही राजकीय संस्कृती जीवंत आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होता. पण अशा या राजकीय बिकट परिस्थितही रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न केल्याचं बघायला मिळत आहे.
रोहित पवार यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. “पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यायला भाग पाडतो तो खेळ असतो आणि महाराष्ट्रात नेहमीच असं खिलाडू वातावरण बघायला मिळतं. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंडिया-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबतचा असाच एक क्षण”, असं रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
टीम इंडियाचा 5 विकेट्सने विजय
दरम्यान, टीम इंडियाने या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी 108 धावांची नाबाद अभेद्य भागीदारी रचत टीम इंडियाला विजयी केलं. टीम इंडियाने या सामन्यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीय. दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 188 धावांवर रोखंल. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराय यो जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा याने 2 तर कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.