Devendra Fadnavis : ठाकरे सरकार अल्पमतात, बहुमत चाचणीचे आदेश द्या, देवेंद्र फडणवीसांची राज्यपालांकडे मागणी
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकारला, मुख्यमंत्र्यांना आदेश द्या की सरकारने बहुमत सिद्ध करावं, अशी मागणी भाजपकडून राज्यपालांकडे करण्यात आलीय. त्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावतील आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतील, अशी दाट शक्यता आहे.
मुंबई : अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा होणार हे आता नक्की आहे. कारण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपच्या काही आमदारांनी आज राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी भाजपकडून राज्यपालांना पत्र देण्यात आलंय. तसंच काही अपक्ष आमदारांनीही राज्यपालांना पत्र दिलं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकारला, मुख्यमंत्र्यांना आदेश द्या की सरकारने बहुमत सिद्ध करावं, अशी मागणी भाजपकडून राज्यपालांकडे करण्यात आलीय. त्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतील, अशी दाट शक्यता आहे.
‘मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाही’
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, माननीय राज्यपालांना आज ईमेल द्वारे आणि प्रत्यक्ष अशाप्रकारे भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्यातील आताच्या परिस्थितीचा उल्लेख केलाय. ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत. शिवेसनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांना राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलाय. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं. असं पत्र आम्ही राज्यपालांकडे दिलंय. राज्यपालांना दिलेल्या पत्रात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा उल्लेख केलाय. त्याआधारे राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य तो निर्देश देतील, अशी आम्हाला आशा आहे.
सत्तासंघर्षात भाजपची अधिकृत एन्ट्री!
आत्तापर्यंत या बंडापासून अंतर ठेवून असलेले भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता यात सक्रिय झाल्याचे दिसते आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर, ते मुंबईत परतले. त्यानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यसह इतर अनेक नेते त्यांच्या सागर या निवासस्थानी आले. त्यानंतर फडणवीस आणि सर्व नेते हे राज्यपालांना भेटण्यासाठी गेले आहेत. या भेटीतून फडणवीसांनी राज्यातील सरकार अल्पमतात आल्याचे सांगून राज्यपालांकडे विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली.
आता पुढे काय?
भाजपनं राज्यपालांना पत्र दिल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न विचारला जातोय. अशावेळी राज्यपाल कोश्यारी यांना विशेष अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी बहुमत चाचणीसाठी तयार असेल तर त्यासाठी एक दिवस निवडला जाईल आणि फ्लोअर टेस्ट होईल, असं कायदेतज्ज्ञांनी सांगितलं. तसंच सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 11 जुलैपर्यंत बहुमत चाचणी होण्याबाबत साशंकता असल्याचंही जाणकार सांगतात.