मुंबई: मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांचा ज्यांचा पत्ता कापला त्या नेत्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यास सुरुवात केली आहे. या नेत्यांना मोठी जबाबदारी देऊन त्यांना बळ देण्याचं कामच पक्षाने सुरू केलं आहे. फडणवीस यांना हा मोठा झटका असल्याचं मानलं जात असून त्यामुळे फडणवीस पक्षात एकटे पडल्याची चर्चाही सुरू आहे.
भाजप नेतृत्वाने गेल्या काही दिवसात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे फडणवीस पक्षात एकटे पडल्याचं दिसून चित्रं आहे. तीन दिवसांपूर्वीच पक्षाने विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला होता. त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. मात्र, आता पक्षाने या दोन्ही नेत्यांचं पुनर्वसन केलं आहे. त्यावरून फडणवीस यांचे पक्षातून पंख कापण्यात येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे 2024च्या निवडणुकीचं नेतृत्व फडणवीस यांच्याकडेच राहील याची काहीच शाश्वती नसल्याचंही दिसून येत आहे.
विनोद तावडे हे फडणवीस सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता कापला गेला. त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. तेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबतीतही घडलं. विदर्भात आणि खासकरून नागपूरमध्ये ओबीसींचं नेतृत्व करणाऱ्या बावनकुळेंचंही तिकीट कापण्यात आलं होतं. विशेष म्हणजे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक म्हणून बावनकुळे यांच्याकडे पाहिले जाते. बावनकुळे हे तेली समाजातून येतात. राज्यात तेली समाजाची मोठी संख्या आहेच. पण बावनकुळेंनी केवळ तेली समाजाचे नेते म्हणून आपली प्रतिमा तयार केलेली नाही. तर ओबीसींचे नेते म्हणून स्वत:चं नेतृत्व निर्मआाण केलं आहे. तरीही त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यामुळे भाजपला विदर्भातील सहा जागांवर मोठं नुकसान सोसावं लागलं होतं.
त्यामुळेच तावडे आणि बावनकुळे यांचं पुनर्वसन म्हणजे फडणवीसांची कन्नी कापण्याचा प्रकार असल्याचं मानलं जात आहे. केंद्रात मोदींचं एक हाती नेतृत्व आहे. त्यामुळे देशात भाजपला फायदाही होत आहे. पण महाराष्ट्रात फडणवीसांच्या एकहाती नेतृत्वाची जादू चाललेली नाही. 2024च्या निवडणुकीतही ही जादू चालणार नसल्याचा पक्ष नेतृत्वाचा कयास आहे. शिवाय पक्ष मराठा आणि ओबीसी समुदायाला नाराज करू शकत नाही. निवडणुकीत या दोन्ही नेत्यांना तिकीट नाकारण्याचा पक्षाला फटकाही बसला आहे. त्यामुळेही या दोन्ही नेत्यांचं पुनर्वसन करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सुद्धा पक्षात साईडलाईन झालेले आहेत. फडणवीस यांनी त्यांना अलगद बाजूला केल्याचं सांगितलं जातं.
राजकारणात सहनशीलता महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी त्यांच्या निवडीनंतर दिली होती. तावडे यांचा हा मेसेज सर्व कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तर, पक्षाने मला राज्य महासचिव केलं. आता विधान परिषद दिली. त्यामुळे मागे काय घडलं याचा मी का विचार करू? असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे.
दुसरीकडे फडणवीस यांच्यामुळे एकनाथ खडसे यांनाही पक्ष सोडावा लागला होता. आपल्या पक्ष सोडण्याचं खापर खडसे यांनी फडणवीसांवर फोडलं होतं. तर, विधानसभेला पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या सुद्धा पक्षात अडगळीत पडल्या होत्या. त्याबाबतची खदखद त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. तसेच पंकजा यांनी पक्षातील नेत्यांवर वारंवार निशाणाही साधला होता. त्यानंतर पंकजा यांचंही केंद्रीय कार्यकारिणीत पुनर्वसन करण्यात आलं. त्यामुळे फडणवीस यांनी ज्यांना ज्यांना डावललं त्यांचं त्यांचं पक्षाकडून पुनर्वसन केलं जात असल्याने या निर्णयाचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7 AM | 26 November 2021https://t.co/XAG7yjNOeJ#TOP9News #Top9 #marathibatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 26, 2021
संबंधित बातम्या:
Constitution Day: … तर संविधानाचं एक पानही आज आपण लिहू शकलो असतो का?: पंतप्रधान नरेंद्र मोदी