Devendra Fadnavis : मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठल्या कामांना पहिली प्राथमिकता, फडणवीसांनी केलं स्पष्ट
Devendra Fadnavis : "तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी नसतो. पुढची वाट अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. एक दिलाने सर्वांना सोबत घेऊन. एवढा मोठा कौल असल्यावर सर्व गोष्टी सर्वांच्या पूर्ण करता येत नाही. पण मोठा गोल घेऊन आपण राजकारणात आलो आहोत" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. दिल्लीहून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातहून विजय रुपाणी केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते. त्यांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाली. भाजपा महायुतीमधील मोठा पक्ष आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर कुठल्या कामांना त्यांची प्राथमिकता असेल ते स्पष्ट केलं.
“अटल बिहारी वाजपेयी यांचं देखील हे 100 वं जयंती वर्ष आहे. या महत्त्वाच्या जयंती वर्षात जनतेने महायुतीवर जबाबदारी दिली आहे. इतका मोठा जनादेश आपल्याला जनतेने दिला आहे. या जनादेशातून एवढंच म्हणेल आनंद आहे. पण जबाबदारी वाढली आहे. प्रचंड मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश जनतेने दिला आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कुठल्या कामांना पहिली प्राथमिकता?
“लाडक्या बहिणी, भाऊ असतील, लाडके शेतकरी, लाडके युवा असतील या सर्वांनी दलित, वंचितांनी जो जनादेश दिलाय, त्याचा सन्मान राखण्याचं काम करावं लागेल. आपण सुरू केलेल्या योजना आणि आश्वासनं पूर्ण करणं ही प्राथमिकता असेलच पण महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी राज्याला सर्व आघाड्यावर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी कार्यरत राहायचं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2019 चा उल्लेख केला
“2019 मध्ये जनतेचा कौल मिळाला होता. पण दुर्देवाने तो हिसकावून घेतला गेला. जनतेसोबत बेईमानी झाली. त्या इतिहासात जात नाही. आपल्याला नवी सुरुवात करत आहोत. अडीच वर्षात त्यांच्या सत्ता काळात आपल्याला त्रास दिला. आमदारांना त्रास दिला. अशा परिस्थितीत अभिमान आहे, या अडीच वर्षात एकही आमदार सोडून गेला नाही. सर्व आमदार, नेते संघर्ष करत होते” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस मोदींबद्दल काय म्हणाले?
“त्यातूनच 2022 मध्ये आपलं सरकार आलं. त्यातूनच आज आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. भाजपला 132 आणि महायुतीला 237 जागा मिळाल्या. हे महाराष्ट्रातील अभूतपूर्व यश आहे. मोदींचे आभार मानले. बुथचा कार्यकर्ता म्हणून, वॉर्डाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. अशा व्यक्तीला तीन वेळा मुख्यमंत्रीपदावर बसवलं. एकदा 72 तासांसाठी होतो. पण टेक्निकली मुख्यमंत्री होतो. हा पक्ष मोठा झाला. त्यांनी संधी दिली. मी मोदींचे आभार मानतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.