सुजय विखेंना पक्षात का घेतलं? मेधाताईंना विधानपरिषद का नाकारली?, देवेंद्र फडणवीसांची उत्तरं
ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं (Devendra Fadnavis on Sujay Vikhe Patil).
मुंबई : लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात केलेल्या नेत्यांना निवडणुकीचं तिकीटं दिली होती (Devendra Fadnavis on Sujay Vikhe Patil). अहमदनगरमध्ये भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांची चांगली कामे असतानाही काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांना निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं. नगरमध्ये भाजपचाच खासदार असताना सुजय विखे पाटलांना निवडणुकीचं तिकीट का दिलं? यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे (Devendra Fadnavis on Sujay Vikhe Patil).
ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यात सुजय विखे पाटील यांना उमेदवारी का दिली?, भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांना विधानपरिषदेत का संधी दिली नाही? अशा प्रश्नांवर फडणवीस यांनी मत मांडलं.
सुजय विखेंना उमेदवारी का दिली?
“अहमदनगरमधील भाजपचे तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांचं काम चांगलं होतं. त्यांनी मेहनतही भरपूर केली. पण आम्ही जे सर्वेक्षण केलं त्यात अँटी इन्कम्बन्सी आढळली. त्यामुळे आपण काही बदल करावं, असा आमचा विचार होता. अहमदनगरमध्ये उमेदवारीसाठी काही नावे होती. ती नावे असताना राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या मुलाने लोकसभेसाठी जवळपास चार वर्षे मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
हेही वाचा : Raj Thackeray Drivers COVID | राज ठाकरे यांच्या वाहनचालकांना कोरोनाची लागण
“लोकसभेच्या निवडणुकीवेळी आमच्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची होती. आमच्यासमोर गेल्या निवडणुकीसारखं 42 जागांवर निवडून आणायचं हे मोठं आव्हान होतं. अशा परिस्थितीत आम्हाला नगरच्या जागेवर थोडी इन्कम्बन्सी दिसली. दिलीप गांधी हे व्यक्ती चांगले आहेत, त्यांनी कामंही केली आहेत. पण तरीही इन्कम्बन्सी दिसली. त्यामुळे आम्ही बदल केला. याचा अर्थ दिलीप गांधी राजकारणात संपले असं नाही. उद्या गांधी तुम्हा पु्न्हा दुसऱ्या कुठल्या पदावरती दिसतील. गांधी पुढे कदाचित आमदार, खासदार, विधानपरिषद किंवा राज्यसभेत दिसू शकतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मेधाताईंना विधानपरिषद का नाकारली?
“मेधा कुलकर्णी यांना तिकीट दिलं तेव्हा तिकीट मागणारे कमी नव्हते. पुण्याचे सध्याचे महापौर मुरली मोहोळ हेदेखील निवडून आले असते. पण त्यावेळेस आपण मेधा कुलकर्णींना तिकीट दिलं. त्यांनी पाच वर्षे चांगलं कामदेखील केलं. याबाबत शंका नाही. त्यांना परत तिकीट दिलं असतं तर त्या पुन्हा निवडूनही आल्या असत्या”, असं फडणवीस म्हणाले.
“आमची पार्लिमेंटरी बोर्डाची बैठक झाली त्यावेळेस स्क्रिनिंग कमिटीचीदेखील बैठक झाली. त्यावेळी भाजपचे अध्यक्ष अमित शाहांनी सांगितलं की, राज्याच्या अध्यक्षांनी निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी चंद्रकांत पाटील तुम्ही लढा, असं सांगितलं. त्यावेळेस कोल्हापूरमधील त्यांची जागा शिवसेनेकडे होती”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“शिवसेना कोल्हापूरची जागा सोडायला तयार नव्हती. मग आम्ही त्यांना कोल्हापूरच्या चंदगडच्या सीटवर लढवावं, असा विचार होता. त्यासाठी सर्वांचं एकमत झालं होतं. पण चंदगड एका बाजूला होतं. याशिवाय ते राज्याचे अध्यक्ष होते. हे सगळं कसं शक्य होऊ शकेल? असा विचार सुरु असताना अमित शाहा म्हणाले की, पुण्याच्या एखाद्या जागेवर लढवता येईल का? असं विचारलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“प्रदेशाध्यक्षांना लढवायचं असेल तर सेफ सीटवर लढवावं लागेल. त्यामुळे पुण्यातील कसबा आणि कोथरुड दोन पर्याय समोर होते. त्यावेळी कोथरुडचा निर्णय झाला. त्यावेळेस मेधा कुलकर्णी यांना तुमचं पुनर्वसन होईल, असं सांगितलं होतं. आता त्यांनी घाई करुन चालणार नाही. पक्षात अनेक लोकं आहेत ज्यांचं पुनर्वसन अजून करु शकलेलो नाहीत. मेधा कुलकर्णी यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांचं राजकारण संपलं असं नाही. त्या अजूनही भरपूर राजकारण करु शकतात. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल पक्षही घेईलच”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.