Sanjay Rathod : संजय राठोडांना मंत्रीपद मिळताच चित्रा वाघ भडकल्या, फडणवीस बॅकफूटवर; म्हणाले…
Sanjay Rathod : संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने रान पेटवले होते. चित्रा वाघ यांनी तर त्यांना चपलेने मारण्याची भाषा केली होती. आधी त्यांचा राजीनामा मागितला आणि आता त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिलं हे चमत्कारिक आहे.
मुंबई: संजय राठोड यांची (Sanjay Rathod) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वर्णी लागली आहे. त्यावरून विरोधकांनी भाजपला (bjp) धारेवर धरलं आहे. संजय राठोड यांचं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलं होतं. त्यामुळे भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी राज्यभर आंदोलन केलं होतं. आरोप सिद्ध होण्याआधीच भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकारला राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. मात्र, आता राज्यात शिंदे-भाजपचं सरकार येताच राठोड यांना मंत्रीपद देण्यात आल्याने विरोधकांनी भाजपला धारेवर धारलं आहे. विरोधकांनीच नव्हे तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना विचारताच त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भाष्य केलं असल्याचं सांगत फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं आहे.
संजय राठोड यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्वकाही स्पष्ट केलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत आणि अनेक नेत्यांवर खटले सुरू असतील अशा पक्षाने अशा प्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा सवाल करतानाच राष्ट्रवादीने आधी आरसा पाहावा आणि मगच अशा प्रकारचं ट्विट करावं, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
चित्रा वाघ यांचं ट्विट काय?
राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी राठोड यांचा एकेरी उल्लेख केला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
आधी पदाचा राजीनामा द्या
चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रियेवरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने रान पेटवले होते. चित्रा वाघ यांनी तर त्यांना चपलेने मारण्याची भाषा केली होती. आधी त्यांचा राजीनामा मागितला आणि आता त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिलं हे चमत्कारिक आहे. संजय राठोड यांच्या विरोधातली लढाई लढाईची असेल तर चित्रा वाघ यांनी आधी भाजप पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
राठोडांवर गुन्हा नाही
मंत्रिमंडळ विस्तार झाला याचा आनंद आहे. संजय राठोड यांच्यावर आणि कोणावरही गुन्हा दाखल नाही. सत्तार यांच्या बाबतीत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, असं शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे म्हणाले. मला बोलावलं नाही यापेक्षा मंत्रिमंडळ विस्तार झाला हे महत्वाचे आहे. नाराजी थोड्याफार प्रमाणात असतेच, असं ते म्हणाले.