Vinayak Mete : ड्रायव्हरने लोकेशन नीट सांगितलं असतं तर…; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
Vinayak Mete : आता 112 नंबरवर कॉल केल्यावर लोकेशन दिसणार आहे. त्याबाबतची कार्यवाही करू. लोकेशन मार्क झालं असतं तर ही दुर्घटना टाळता आली असती. आता लोकेशनच्या आधारावरच पोलिसांना कळलं पाहिजे, अशी यंत्रणा निर्माण करू.

मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनावर आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी अपघात कसा घडला? त्यानंतर मेटे यांच्या ड्रायव्हरची भूमिका, पोलिसांचं (police) काम या सर्व गोष्टींवर भाष्य केलं. मेटे यांच्या ड्रायव्हरने 112 नंबरवर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली होती. पण त्याने लोकेशन नीट सांगितले नाही. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणाचा बराच शोध घेतला. टनेलच्या दीड किलोमीटरपर्यंत पोलिसांनी पाहणी केली. पण त्यांना अपघताचं ठिकाण सापडलं नाही. ड्रायव्हरला नीट लोकेशन सांगता आलं नाही. कदाचित तो संभ्रमा अवस्थेत असावा. लोकेशन नीट कळलं असतं तर वेळेत मदत मिळू शकली असती, असं फडणवीस यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलत होते. ड्रायव्हरने 112 नंबरला फोन केला होता. त्यांनी हा नंबर नवी मुंबई पोलिसांना वर्ग केला. फोन येताच नवी मुंबई पोलीस घटनास्थळी निघाले. टनेलजवळ आले. त्यांना काहीच दिसलं नाही. पोलिसांनी पुन्हा एक दीड तास शोध घेतला. फोन खरा की खोटा माहीत नाही. त्यानंतर रायगड पोलिसांना अलर्ट करण्यात आलं. ड्रायव्हर भांबावलेला होता. नंतर आयआरबीला सांगितलं. आयआरबीची गाडी अवघ्या सात मिनिटात घटनास्थळी पोहोचली. ते मेटेंना रुग्णालयात घेऊन गेले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता की नाही चौकशीत निघेल. मृत्यू जागीच की हॉस्पिटलमध्ये जाताना झाला याची माहितीही चौकशीतून समोर येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.




आता नंबर डायल केल्यावर लोकेशन कळणार
आता 112 नंबरवर कॉल केल्यावर लोकेशन दिसणार आहे. त्याबाबतची कार्यवाही करू. लोकेशन मार्क झालं असतं तर ही दुर्घटना टाळता आली असती. आता लोकेशनच्या आधारावरच पोलिसांना कळलं पाहिजे, अशी यंत्रणा निर्माण करू. या प्रकरणात हद्दीचा प्रश्न आला नाही. पोलीस हद्दीच्या पलिकडेही गेले होते. पण ड्रायव्हर योग्य स्पॉट सांगू शकला नाही. त्यामुळे ही अडचण झाली. मोठे ट्रेलर्स लेन सोडून चालतात. त्यावर नियंत्रण नाही. त्यावर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम लावणार आहोत. या रोडचं ट्रॅफिकिंग करणार. एखादा ट्रॉलर लेन सोडून चालला तर त्याची माहिती मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.
ड्रायव्हरचा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न
शेवटच्या लेन मधून जाणाऱ्या ट्रॉलर मधल्या लेन मधून गेला ते अतिशय चुकीचे होते. ट्रॉलरने लेन बदलली. त्यामुळे त्यांच्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करायला जागा मिळाली नाही. अखेर मेटेंचा ड्रायव्हर तिसऱ्या लेनमधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते समोरील गाड्यांमुळे जमले नाही. थोडीशी जागा होती त्यातून मार्ग काढून ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. ते अतिशय चुकीचे जजमेन्ट होते. कारण तेवढी जागा नव्हती. बॉडी गार्ड आणि मेटे साहेब जिकडे बसले होते तिकडे जबर धक्का लागला. थेट जबर डॅश लागली. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचे बहुधा जागेवरच निधन झाले असावे, असंही ते म्हणाले.