Dhananjay Munde case | ‘जिनके घर शीशे के होते हैं’, पवारांपाठोपाठ राऊतांचाही भाजपला इशारा
भाजप नेत्यांच्या आक्रमकतेला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई: धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर अजून एक गंभीर आरोप करण्यात येत आहेत. धनंजय मुंडे यांनी 2019 च्या निवडणूक अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायको आणि मुलांचा उल्लेख केला नाही, असा तो आरोप आहे. त्यावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. भाजप नेत्यांच्या या आक्रमकतेला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.(Sanjay Raut and Sharad Pawar warn BJP leaders)
“काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारु नये. हा मंत्र सर्वांसाठी लागू आहे. खासकरुन बेताल विरोधी पक्षाला लागू आहे. हमाम मे सब नंगे आहेत याचं भान विरोधी पक्षाने ठेवायला हवं,” अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या निवडणूक अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात लग्नासंदर्भातील माहिती दडवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्या आरोपाच्या संदर्भाने संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे.
शरद पवारांचाही टोला
धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दडवल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. “शपथपत्रात मुंडे यांनी माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. त्यातील काही तांत्रिक गोष्टी बघाव्या लागतील. देशात अशा अनेक गोष्टीही झाल्या आहेत. देशातील सर्वोच्च प्रमुखांच्याबाबतीतही अशा गोष्टी झाल्या आहेत. त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही. सत्ता हातून गेल्याने काहीजण अस्वस्थ झाले आहेत,” असा टोला पवारांनी लगावला आहे.
सोमय्या, भातखळकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
किरिट सोमय्या यांच्यासह भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलांची माहिती लपवली आहे. हा एकप्रकारे निवडणूक प्रक्रिया आणि नियमांची पायमल्ली असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं पत्रच त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे.
संबंधित बातम्या:
धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल : शरद पवार रोखठोक
Dhananjay Munde case | धनंजय मुंडेंसाठी फडणवीसांची ढाल; पवारांकडून भाजपची कोंडी
Sanjay Raut and Sharad Pawar warn BJP leaders