अमरिश पटेल – विजयाची हॅटट्रिक, तरीही 12 महिन्यांसाठी आमदार!
अमरिश पटेल यांना 332 तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली.
धुळे : धुळे नंदुरबार (Dhule Nandurbar) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल (BJPs Amrish Patel political journey) यांनी आपला दबदबा सिद्ध केला. अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. अमरिश पटेल यांना 332 तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला. (Amrish Patel MLC for only twelve months)
या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे अमरिश पटेल यांनी भाजपची मतं तर मिळवलीच, मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मतं फुटली. जर आकड्यातच बोलायचं झालं तर भाजपाचे 199 तर महाविकास आघाडीचे 213 इतकी मतं होती. मात्र महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याने अभिजित पाटील यांचा पराभव झाला आणि भाजपाचे अमरिश पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. अमरिश पटेलांच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
धुळे- नंदुरबार निवडणुकीतील संख्याबळ
- भाजप – 199
- काँग्रेस – 157
- राष्ट्रवादी – 36
- शिवसेना 22
- एमआयएम – 9
- समाजवादी पार्टी – 4
- बहुजन समाज पार्टी – 1
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1
- अपक्ष – 10.
अमरिशभाई 12 महिन्यांसाठी आमदार
अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. अमरिश पटेल यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी राजीनामा दिल्यामुळे, विधानपरिषदेची त्यांची जागा रिक्त झाली. खरं तर अमरिश पटेल यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांचा कार्यकाळ 14 डिसेंबर 2021 पर्यंत होता. पण राजीनाम्यामुळे पुन्हा निवडणूक लागली. ही निवडणूक मार्च 2020 मध्ये नियोजित होती, पण कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलली. ही निवडणूक डिसेंबर 2020 मध्ये पार पडली आणि केवळ 12 महिन्यांसाठी निवडणूक लागली.
या निवडणुकीत जो उमेदवार विजयी होईल तो केवळ 12 महिन्यांसाठीच आमदार होईल हे निश्चित होतं. मात्र अमरिश पटेल यांनी पुन्हा दावेदारी दाखल करुन उरलेल्या 12 महिन्यांसाठीही आपणच आमदार असू, हे सिद्ध केलं.
अमरिश पटेल यांचा तिसरा विजय
अमरिश पटेल यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये बिनविरोध विजय मिळवला होता. मग 2015 मधील विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल हे 321 मतांनी विजयी झाले. त्यानंतर 2020 च्या पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांनी 234 मतांनी विजयी मिळवून, आपली ताकद दाखवून दिली.
अमरिश पटेल यांची कारकीर्द
अमरिश पटेल हे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना महत्त्वपूर्ण स्थान होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.
- 1985 -शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष
- 1990 -शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
- 1995 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
- 2000 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
- 2005 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
- 2009 -धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर
- 2015 – धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर सदस्य
- 2019 मध्ये काँग्रेस सोडली, आता 2020 मध्ये भाजपच्या तिकीटावरही विजयी
(Amrish Patel MLC for only twelve months)
संबंधित बातम्या
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेलांची विरोधी मतांमध्ये धाड, दणदणीत विजय#amrishpatel #Legislativecouncilelections #ThackreySarkarTest #MahaResultTv9 https://t.co/bWdMHcpGFE
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 3, 2020