शिंदे गट अस्वस्थ? एक जण भाजपच्या वाटेवर?
अभिनेते दिगंबर नाईक लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटातील एकीत कुठेतरी अस्वस्थता आहे का, असा सवाल विचारला जात आहे.
अक्षय मंकणी, मुंबईः शिवसेनेत उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thaceray) नेतृत्व झुगारून देणारा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट भाजपात शामिल होतो की काय अशा चर्चा काही दिवसांपूर्वी होत्या. पण आम्ही शिवसेनाच आहोत, असं शिंदे गटानं कोर्टातही ठणकावून सांगितलंय. पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही मंडळी अस्वस्थ असल्याने आता भाजपात जाणार की काय, या चर्चा पुन्हा सुरु झाल्यात. या वातावरणात आणखी एक बातमी समोर येतेय. शिंदे गटातील स्टार प्रचारक अशी ओळख असलेले अभिनेते दिगंबर नाईक (Digambar Naik) हे भाजपात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्या एका कार्यक्रमाला दिगंबर नाईक यांनी नुकतीच उपस्थिती लावली. त्यामुळे ते भाजपात जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय.
मालवणी भाषेत गाऱ्हाणं घालण्यासाठी दिगंबर नाईक प्रसिद्ध आहेत. शिंदे गटातील वातावरण अस्वस्थ असल्यामुळे दिगंबर नाईक भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. दिगंबर नाईक हे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे निकटवर्तीय आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचा एक कार्यक्रम झाला. यात त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. तिथं गाऱ्हाणंदेखील घातलं होतं.
मुंबई महापालिका काबीज करणं हे भाजपासाठीचं मोठं उद्दिष्ट आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक कार्यक्रम भाजपतर्फे भव्य स्वरुपात केला जातोय.
गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात दिगंबर नाईक यांनी कोकणी गाऱ्हाणं गायलं होतं.
मुंबईकरांची भ्रष्टाचारातून, अपप्रवृत्ती आणि असुविधेतून सुटका होवो, असं गाऱ्हाणं त्यांनी घातलं होतं.
हे गाऱ्हाणं ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौतुकही केलं होतं.
आता दिगंबर नाईक लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटातील एकीत कुठेतरी अस्वस्थता आहे का, असा सवाल विचारला जात आहे.