‘अजितदादा, पक्षाला बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचं कटकारस्थान’, नवाब मलिकांचा भाजपवर आरोप
आमच्या नेत्यांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय.
मुंबई : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे (Rajendra Ghadage) यांच्या जरंडेश्वर कारखान्यावर (Jalendrashwar Sugar) जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर बदनामीचा आरोप केलाय. आमच्या नेत्यांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. (Nawab Malik responds to ED action and allegations against Ajit Pawar)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आणि परिवाराच्याबाबतीत ज्यापध्दतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचं आहे, असं मलिक म्हणाले. साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. ज्या काही कायदेशीर कारवाई असतील ती ईडी करत असेल. परंतु अजितदादा आणि त्यांच्या परिवारातील कुणीही बेकायदेशीर कामे केलेली नाहीत. त्यांची बदनामी करण्यासाठी बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोप मलिक यांनी केलाय.
जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई
अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं आहे. यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हा कारखाना अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्यावर असल्याचं सांगितलं जात आहे.
ईडी कारवाईवर राजू शेट्टींचा आरोप
माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ईडीच्या कारवाईवर टीका केलीय. मी अनेक दिवसांपासून सांगत आहे की, सीबीआय, ईडी या केंद्राच्या हातात आहेत. त्याचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो आहे. केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही. 43 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चूक आहे. कारण, हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत, अशा शब्दात शेट्टी यांनी भाजपवरही टीका केलीय.
सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकला आहे. ईडीकडे 5 वर्षे फेऱ्या मारल्या. 43 कारखान्यांची यादी हवी असेल तर पुन्हा देतो. ईडी एकप्रकारे राजकीय दृष्ट्या काम करत आहे. अनेकदा मी ईडीकडे खेटे घातले. 5 वर्षांपूर्वी पुरावे दिले होते. मात्र, आता ही कारवाई करण्यात आली! याचा अर्थ ईडीला कुणीतरी सांगत आहे, अमूक अमूक माणूस त्रासदायक ठरतो, म्हणून त्याचा काटा काढायचा आहे, असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केलाय.
राज्यपाल म्हणाले, फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, आता उद्धव ठाकरेंचं रोखठोक पत्र https://t.co/IzEaG7Megu #Maharashtra | #CMUddhavThackeray | #Governor | #Politics
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 2, 2021
संबंधित बातम्या :
अजित पवार-हसन मुश्रीफ यांना दिलासा, राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सहकार विभागाचीही क्लीन चिट
राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चिटविरोधात माजी मंत्र्यांसह पाच जणांची याचिका
Nawab Malik responds to ED action and allegations against Ajit Pawar