अनिल परब यांना आणखी एक समन्स, चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहा, ईडीचे आदेश
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या 28 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे.
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या 28 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे. अनिल परब यांना पाठवण्यात आलेलं हे दुसरं समन्स आहे. यापूर्वी त्यांना 31 ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचं कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र आता ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पहिलं समन्स
परिवहनमंत्री अनिल परब यांना 29 ऑगस्ट रोजी ईडीने पहिलं समन्स पाठवलं होतं. त्यावेळी याबद्दलची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली होती. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली होती.
ईडीची नोटीस नेमकी कशासाठी ?
अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांना ईडीने 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं होतं.
संजय राऊत ट्विटमध्ये काय म्हणाले होते ?
” शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र,” असं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते.
ईडी नोटीसीवर अनिल परब यांची प्रतिक्रिया
“मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणं कठीण आहे. नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ”, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी ईडी नोटीस मिळाल्यानंतर दिली होती.
(ED has sent a third summons to Maharashtra Minister Anil Parab)
हे ही वाचा :
ईडीची ‘100 कोटी वसुलीची नोटीस’, अनिल परब मात्र फार फार 60 शब्द बोलून निघून गेले
अनिल परबांना ईडीची नोटीस, राऊत म्हणतात, वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं, नॉर्मल माणसं लढाया लढतात
हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा, नितेश राणे यांचं अनिल परब यांना आव्हान