संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी, समोरासमोर बसवून प्रश्नोत्तरांचा तास होणार?
वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी (ED Inquiry) होणार आहे. वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना समन्स बजावलं. आता आज त्यांची चौकशी होणार आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. जवळपास 3 कोटींचा पैशांचा घोटाळा झाल्याचा हा आरोप आहे. हे पैसे खात्यात आले कसे? याबाबत ईडी वर्षा राऊत यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे संजय राऊतांसह कुटुंबियांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे.
वर्षा राऊतांवर गैरव्यवहाराचे आरोप
प्रवीण राऊत यांनी संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात 1 कोटी 6 लाख रुपये टाकले होते. याच पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. त्यामुळे ईडीकडून वर्षा राऊत यांची खाती तपासली जात आहे. तसेच त्यांच्या खात्यात आणखी मोठे व्यवहार झालेत का त्याची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलवलं आहे. त्यांच्या खात्यात हा पैसा आला कुठून? कशासाठीचे हे पैसे आहेत? त्या मागचा स्त्रोत काय? आदी माहिती ईडी वर्षा राऊत यांच्याकडून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राऊत यांनी प्रवीण राऊतांकडून आलेल्या पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. त्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्चही आम्ही तपासत आहोत. आम्ही वर्षा राऊत यांची खाती तपासत आहोत. राऊतांशी संबंधितांना नोटिसा पाठवल्या असून सोमवारपासून त्यांची चौकशी करणार आहोत. त्यामुळे राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्याची मागणी ईडीने कोर्टासमोर केली होती. तर राऊत यांच्या वकिलाने हे आरोप फेटाळून लावली होती. हे आरोप नवे नाहीत. राऊतांवर यापूर्वीही असे आरोप झाले आहेत. हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. वर्षा राऊत यांच्या व्यवहाराची ईडीला माहिती आहे, असं राऊत यांच्या वकिलाने काल म्हटलं होतं.