‘ज्या ज्या ठिकाणी माझं बळ, त्या त्या ठिकाणी स्वतंत्र गट स्थापन करणार’, एकनाथ खडसेंचा एल्गार
भाजपमधून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी खडसे समर्थकांचं बळ आहे त्या त्या ठिकाणी भाजपच्या बाहेर राहून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा स्वतंत्र गट करणार असल्याचं सांगितलं आहे.
मुंबई : भाजपमधून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी खडसे समर्थकांचं बळ आहे त्या त्या ठिकाणी भाजपच्या बाहेर राहून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा स्वतंत्र गट करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव जिल्हा परिषदेसह काही महानगरपालिकांमध्ये बंडखोरीची शक्यता आहे. यावेळी खडसेंनी हा स्वतंत्र गट राष्ट्रवादी काँग्रेससोबत बाहेरुन राहिल, असंही नमूद केलं आहे (Eknath Khadse comment on his next political strategy ).
एकनाथ खडसे म्हणाले, “ज्या ज्या ठिकाणी आमचं बळ आहे त्या त्या ठिकाणी स्वतंत्र गट स्थापन करण्याची शक्यता आहे. स्वतंत्र ताकद उभी करुन भाजपच्या बाहेर राहतील आणि राष्ट्रावादीसोबत येतील. अशी शक्यता असलेल्या काही महापालिका आहेत, काही नगरपालिका आहेत. या ठिकाणी पक्षांतर कायद्याची बाधा न येता स्वतंत्र गट स्थापन करणे शक्य होणार असेल तर अनेकांनी त्याची तयारी माझ्याकडे दाखवली आहे. नगरसेवकांची तयारी असेल तर जळगाव जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल अशा ठिकाणी हा प्रयोग पुढील कालखंडात करु.”
संपूर्ण महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे. या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी पक्षाचं काम वाढवण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे, असंही एकनाथ खडसेंनी नमूद केलं.
‘बहुजन मुख्यमंत्री करण्याच्या मागणीनंतर माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा’
एकनाथ खडसे यांनी आपल्यामागे केव्हा चौकशीचा ससेमीरा सुरु झाला याबद्दल गौप्यस्फोट केलाय. ते म्हणाले, “भाजपला शेटजी भटजींचा पक्ष म्हटलं जात होतं.. मारवाडी भटांचा पक्ष अशी या पक्षाची ओळख होती. मात्र ही ओळख पुसण्यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करुन पुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून आम्ही काम करतोय. या पक्षाचा बहुजन चेहरा करण्याचा प्रयत्न केला.”
“2014 नंतर मात्र मी बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला.. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालंय हे मान्यच करावं लागेल,” असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
मुंबई ते जळगाव, एकनाथ खडसेंचं राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी जंगी स्वागत
रात गयी, बात गयी, खडसेंबाबतच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची कमेंट
नाथांच्या जाण्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही – बच्चू कडू
संबंधित व्हिडीओ :
Eknath Khadse comment on his next political strategy