आम्ही 50 नाही तर हजार खोके दिले- एकनाथ शिंदे
खोक्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाष्य काय म्हणाले? पाहा...
मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या ‘खोके’ (Khoke) शब्दाच्या भोवती टीकेचं वादळ फिरतंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांना ‘खोके’ देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच उघडपणे भाष्य केलंय. मी फक्त 50 नाही तर हजार खोके दिलेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
शिंदे नेमकं काय म्हणाले?
मी काल भंडाऱ्यात बोलताना म्हणालो की, आम्ही 50 नाही तर 200 खोके दिले. पण आज मी सांगतो की आम्ही फक्त 50 नाही तर हजार खोके विकासासाठी दिलेत, असं शिंदे म्हणालेत. विकासकामांना दिल्या गेलेल्या निधीवर बोलताना त्यांनी हे भाष्य केलं.
आमदारांना काय दिलं?
एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना आमदारांना काय काय दिलं? यावरही सार्वजनिक व्यासपिठावर भाष्य केलं. लोकांना वाटतं की आमदार स्वार्थापोटी माझ्यासोबत आले. तर तसं नाहीये. आम्ही सत्तेत होतो. काही जणांकडे तर मंत्रिपदही होतं. पण तरीही त्यांनी या सगळ्याला पाठ दाखवत माझ्यासोबत येणं पसंत केलं. त्याचं कारण म्हणजे त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास… मी त्यांच्या मतदार संघातील कामं करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली. विकासनिधी उपलब्ध करून दिला. या आमदारांना माझ्या कामावर विश्वास आहे म्हणून सगळे आमदार माझ्यासोबत आले. यात खोक्यांचा काहीही संदर्भही नाहीये, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
भाजपसोबत कशासाठी?
याच भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचं कारण सांगितलं. भाजपसोबत आमची नैसर्गिक युती होती. ती आम्ही एकत्र येत टिकवली. बाळासाहेबांच्या विचारासाठी आम्ही एकत्र आलो. हिंदुत्वासाठी एकत्र आलो, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.