“प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल आदर कायम”, उदय सामंतांचं स्पष्टीकरण
शिंदेगट दादरमध्ये प्रतिशिवसेना भवन बांधणार असल्याची चर्चा होत आहे. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल आदर कायम आहे", असं उदय सामंत म्हणाले आहेत.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेची ओळख असलेल्या धनुष्यबाणावर दावा केल्यानंतर आता दादरमध्ये प्रतिशिवसेना भवन बांधणार असल्याची चर्चा होत आहे. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल (Shivsena Bhavan) आदर कायम आहे”, असं उदय सामंत म्हणाले आहेत. “मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत, हा गैरसमज पसरवला जात आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवनबद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील”, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.
मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे..मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे..शिवसेना भवन बद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील.
हे सुद्धा वाचा— Uday Samant (@samant_uday) August 12, 2022
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, आणि शिवसेना भवन कुणाचं? असा प्रश्न विचारला जातोय. त्याचवेळी शिंदे गट मुंबईत प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात जोरात सुरु आहे. त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयासाठी शिंदे गटाकडून दादरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिलीय. त्यामुळे शिंदेगट दादरमध्ये प्रतिशिवसेना भवन बांधणार असल्याची चर्चा होती त्यावर आता उदय सामंतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
दादरमध्ये एखादं कार्यालय हवं- सरवणकर
आम्ही शिवसेनेतेच आहोत, आम्हीच खरी शिवसेना असं शिंदे गटातील नेते सांगतात. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे प्रति शिवसेना भवन तर उभारण्याच्या तयारीत तर नाहीत ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याबाबत विचारलं असतं नवं जुनं असा कुठलाही भाग नसेल. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील लोकप्रीय मुख्यमंत्री आहेत. राज्यभरातून लोक त्यांना भेटण्यासाठी येतात, त्यासाठी एखादं कार्यालय हवं. त्यामुळे दादरमध्येच एखादं कार्यालय हवं असा आमचा मानस आहे. कार्यालय निश्चित असेल तर त्यात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जातील. कार्यालयाचं नाव काय ठेवायचं ते नंतर ठरवलं जाईल. फक्त दादरच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावलाय. ‘प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे’, अशा शब्दात पाटील यांनी शिंदेंना टोला लगावलाय.