Eknath Shinde : आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मगच चर्चा; संजय राऊतांच्या आवाहनानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची आमची तयारी आहे, असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मात्र, संजय राऊतांच्या या आवाहनानंतर एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांकडून आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मगच चर्चा, अशी ठामपणे सांगितल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आतापर्यंत एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन करत होते, त्याचबरोबर इशाराही देत होते. पण आज अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रस्तावावर विचार होईल, पण 24 तासाच्या आत परत या, असं आवाहन त्यांनी केलंय. एकनाथ शिंदे यांनी आपली मागणी लावून धरल्यानंतर अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एक पाऊल मागे आले आहेत. शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची आमची तयारी आहे, असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मात्र, संजय राऊतांच्या या आवाहनानंतर एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांकडून आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मगच चर्चा, अशी ठामपणे सांगितल्याची माहिती मिळतेय.
संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना आवाहन
तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना तुमच्या प्रस्तावावर विचार होईल, पण 24 तासांत मुंबईत या, असं आवाहन त्यांनी केलंय. संजय राऊत म्हणाले की, आमदारांनी आधी महाराष्ट्रात यावं. मुंबईत यावं. अधिकृतपणे मागणी करावी. त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. पण आमदारांनी आधी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. तिथं बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण पक्के शिवसैनिक आहात. शिवसेना सोडणार नाह, असं सांगताय. सध्याच्या सरकारविषयी तुमची भूमिका असेल तर त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. 24 तासात परत या, हे मी जबाबदारीनं परत सांगतोय. मी हवेत मी भूमिका मांडत नाहीये. उद्धव साहेबांसमोर बसू आणि तुमची भूमिका स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं राऊत आवाहन राऊत यांनी केलंय.
‘मातोश्री’वरील आमदारांची संख्या फक्त 15 वर!
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात बंड केले होते तेव्हा शिवसेनेकडे 22 आमदार शिल्लक होते. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढली असून, आता शिवसेनेकडे केवळ 15 च आमदार आहेत. त्यामध्ये राजन साळवी (राजापूर), सुनील प्रभू (मालाड), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), सुनील राऊत ( विक्रोळी), वैभव नाईक ( कुडाळ-मालवण), आदित्य ठाकरे ( वरळी), रमेश कोरगावकर (भांडुप), कैलास पाटील (पाचोरा), नितीन देशमुख ( बाळापूर), अजय चौधरी (शिवडी), राहुल पाटील (परभणी), संतोष बांगर ( हिंगोली), भास्कर जाधव (गुहागर), रवींद्र वायकर ( जोगेश्वरी) आणि संजय पोतनीस ( कलिना) यांचा समावेश आहे.